मंत्री असताना ज्या मराठवाडय़ासाठी मी मुकणे धरण बांधले, तेच आज माझे पुतळे जाळत आहेत. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ व समन्यायी पाणीवाटप अहवाल समितीचे प्रमुख मेंढेगिरी यांनी न्यायालयात चुकीची माहिती दिल्याने त्यांचा निषेध करतो, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ त्वरित रद्द करून नगर व नाशिकसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांनी गुरुवारी केली.
जायकवाडीला पाणी मिळविण्यासाठी मराठवाडय़ातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र आले आहेत. पाणी मिळवण्यात त्यांना यश आले, तर त्यामुळे नगर-नाशिक जिल्हय़ातील निफाड, सिन्नर, येवला, कोपरगाव, राहाता व अन्य सहा तालुके उद्ध्वस्त होण्याची भीती असताना हक्काच्या पाण्यासाठी एकटा कोपरगाव तालुका लढा देत आहे. शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, निफाडचे आमदार अनिल कदम, कोपरगावचे आमदार अशोक काळे यांची पक्षाच्या धोरणानुसार जायकवाडीस पाणी देण्यास मूकसंमतीच दिसते, हे आपले दुर्दैव आहे अशी टीकाही कोल्हे यांनी केली.
संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या ५१व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन गुरुवारी झाले. त्यानंतर झालेल्या चर्चासत्रात कोल्हे बोलत होते. कारखान्याचे संचालक विश्वासराव महाले व त्यांच्या पत्नी चित्रा यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार होते. आमदार चंद्रशेखर घुले, कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे आदींसह नगर व नाशिक जिल्हय़ातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कोल्हे यांचा मराठवाडय़ात पुतळा जाळल्याबद्दल जायकवाडी संघर्ष समितीचे जयाजी सूर्यवंशी यांचा येथे निषेध करण्यात आला.
कोल्हे म्हणाले, मी मराठवाडय़ासाठी राज्य सरकारकडून ४५० कोटी रुपये आणून मुकणे धरण पूर्ण केले तेच पाणी ते आज वापरत आहेत. माझे पुतळे जाळणा-यांनी २५ वर्षांत नव्या पाण्याची कोणतीही निर्मिती केली नाही. खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रशांत बंब, आमदार आर. एम. वाणी यांचा पाणी निर्माण करण्यासाठी कोणता त्याग आहे हे त्यांनी जनतेला सांगावे. मराठवाडय़ाला पाणी मिळू नये अशी आपली भूमिका नाही, तेथील शेतकरीदेखील आमचे भाऊच आहेत. जायकवाडी धरणाची क्षमता नेमकी किती हेच माहिती नसणारे आमचे पुतळे जाळत आहेत. त्यांना ३३ टक्के पाणी देण्याचे धोरण ठरवावे. जायकवाडीचे भले करून नाशिक व नगर जिल्हय़ातील शेतक-यांचे वाटोळे करू नका. आपले आमदार अजूनही झोपेतच आहेत. त्यांनी पाणीप्रश्नी न्यायालयात धाव घेतली. ही प्रक्रिया विलंबाची आहे. पाणीप्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरून जेलभरो आंदोलनच करावे लागेल. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी लक्ष घालण्याचा शब्द दिला आहे, त्यामुळे पाणीप्रश्न सुटण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत असे कोल्हे म्हणाले.
प्रास्ताविक बिपीन कोल्हे यांनी केले. ते म्हणाले, तालुक्याचा पाटपाणी गंभीर बनला आहे. भविष्यातील पाण्याची दिशा ठरविण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. मराठवाडा विरुद्ध नगर-नाशिक असा संघर्ष सुरू झाला आहे. तुटीच्या पाण्याचे वाटप होत आहे. समोरचे वेडे झाले, ते कपडे फाडायला लागले म्हणून आपणही वेडे होऊ नये असे आवाहन त्यांनी केले. या लढय़ात शंकरराव कोल्हे एकटे नसून केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पाटबंधारेमंत्री सुनील तटकरे व पालकमंत्री मधुकरराव पिचड व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे, असे शेलार म्हणाले. आमदार घुले यांचेही या वेळी भाषण झाले.