रस्त्यावरील बेघर, भिकाऱ्यांना रात्रीचा निवारा देण्यासाठी कल्याण-डोंबिवली पालिकेने केंद्र शासनाच्या सूचनेवरून डोंबिवलीतील पांडुरंगवाडीत रात्र निवारा केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात बेघरांऐवजी सहा कुटुंब व पालिकेचे दोन कर्मचारी वास्तव्य करीत असल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे हे निवारा केंद्र चालविणाऱ्या ठेकेदाराने या केंद्राच्या माध्यमातून सहा हजार रुपयांचे भाडे जमा केले आहे.
रेल्वे स्थानके, पदपथांवर रात्रीच्या वेळेत अनेक भिकारी, पांथस्थ झोपलेले असतात. त्यांना रात्रीच्या वेळेत निवारा म्हणून केंद्र शासनाने रात्र निवारा केंद्राची संकल्पना पालिकांना राबविण्यास सांगितली. पालिकेने दीड वर्षांपूर्वी पांडुरंगवाडीत सर्वोदय सोसायटीलगत तीन मजली इमारतीत १६ खोल्यांचे रात्र निवारा केंद्र सुरू केले. पहिले काही दिवस पालिका कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या वेळेत रस्तोरस्ती फिरून बळजबरीने काही भिकाऱ्यांना या केंद्रात आणून त्यांची सेवा केली, पण हे काम अवघड असल्याने पालिकेने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात हे निवारा केंद्र गुरुकृपा विकास संस्थेचे मालक जगदीश पवार यांना चालवायला दिले.
या केंद्रात आता काही बाहेरची मंडळी कुटुंबासह येऊन राहतात. रात्रीच्या वेळेत ही कुटुंब आरडाओरडा करतात. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना त्याचा त्रास होतो. केंद्राचे प्रवेशद्वार बंद असेल तर ते उघडण्यासाठी मोठा आवाज केला जातो, अशा तक्रारी स्थानिक रहिवाशांनी केल्या आहेत. या केंद्रात आता बाहेरची व पालिका कर्मचारी मिळून एकूण सहा कुटुंब ऐशआराम करीत आहेत.
प्रभाग अधिकारी चंदुलाल पारचे यांनी दिलेल्या माहितीनुसार हे केंद्र ठेकेदाराला चालविण्यासाठी दिले आहे. त्यामध्ये बेघरांव्यतिरिक्त नागरिक राहात असतील तर ते धक्कादायक आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
ठेकेदार जगदीश पवार यांनी पत्रकारांना सांगितले, एक रुपया नाममात्र मासिक भाडय़ाने हे केंद्र चालविण्यास घेतले आहे. एक रात्रीचे ५० रुपये दर येथे आहे. तीन वर्षांसाठी हे केंद्र चालविण्यास घेतले आले. या केंद्रात सहा जण पहिल्यापासून आहेत. इतर दोन जण पालिकेचे कर्मचारी आहेत. गेल्या तीन महिन्यांत केंद्राच्या माध्यमातून सहा हजार रुपये भाडे जमा केले आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.