महापालिका कामगारांचे ५ महिन्यांचे थकीत वेतन अदा करावे, तसेच रोजंदारी कामगारांना कायम करावे आदी ३० मागण्यांसाठी मराठवाडा न. प. व मनपा कामगार कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.
आयटक प्रणीत मनपा सफाई कामगार कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक संप करून हा मोर्चा नेला. मानवतच्या संपकरी ४९ कामगारांचे निलंबन रद्द करण्याची मागणीही या मोर्चाद्वारे करण्यात आली. परभणी शहरात नगरपालिका असताना कामगार कर्मचाऱ्यांचे वेतन ३-३ महिने रखडत असे. महापालिका झाल्यानंतर कामगारांचे वेतन ५-५ महिने रखडत आहे. महापालिका होऊन कोणता विकास साधला गेला, असा सवाल कामगारांनी केला. मोर्चासमोर बोलताना कॉ. राजन क्षीरसागर यांनी परभणी मनपाला राज्य सरकारकडून ४ कोटी रुपये येणे बाकी आहे. स्थानिक संस्था कर वसुलीच्या रकमेपकी वेतनावर खर्च करण्याची रक्कम निर्धारीत केली नाही. मनपा व न. प. कायद्याप्रमाणे वेतनासंदर्भात कोणत्याही कायद्याचे पालन केले जात नाही, असा आरोप केला.
दुसऱ्या व चौथ्या शनिवारची सुटी सरकारच्या सेवाशर्तीनुसार सर्व कामगारांना लागू आहे. मात्र, त्याचा कार्यालयीन कर्मचाऱ्यांना लाभ दिला जातो. सफाई कामगारांना मात्र त्यापासून वंचित ठेवले जाते, असेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. विनाकाम पगार घेणाऱ्यांना मोकळे सोडायचे व काम करणाऱ्यांनाच चार वेळा बायोमेट्रिक, नोंदवही यांसारख्या पद्धती लादायच्या, याकडेही मोर्चाद्वारे लक्ष वेधण्यात आले. युनियन व आयटकचे जिल्हा चिटणीस कॉ. क्षीरसागर, गणपत गायकवाड, कॉ. सय्यद इब्राहीम आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. किरण गायकवाड, भगवान कनकुटे, पिराजी िझजूर्डे, सुलोचनाबाई भालेराव, उषाबाई सोनकांबळे, चंदू आराटे, सिद्धार्थ कांबळे आदींनी सहभाग नोंदवला.