News Flash

‘अश्वराज ट्रॉफी’ उद्योजक कुंभारदरे यांच्या हस्ते देऊन अश्वमालकांचा गौरव करण्यात आला.

सुदृढ व निरोगी अश्वाला ‘अश्वराज ट्रॉफी’ उद्योजक कुंभारदरे यांच्या हस्ते देऊन अश्वमालकांचा गौरव करण्यात आला.

| April 21, 2013 02:16 am

महाबळेश्वरातील बहुतेक सर्व घोडे (अश्व) निरोगी, सुदृढ व अतिशय सुंदर निगा राखलेले आहेत. याबद्दल येथील अश्वमालकांचे कौतुक असून यापुढेही त्यांनी आपल्या अश्वांची अशीच निगा ठेवून, येणाऱ्या पर्यटकाला निरोगी, सुदृढ अश्व सवारीचा आनंद द्यावा, असे आवाहन उद्योजक व माजी नगरसेवक रवींद्र कुंभारदरे यांनी केले.
रोटरी क्लब महाबळेश्वर व माजी नगरसेवक रवींद्र कुंभारदरे यांच्या संयुक्त विद्यमाने येथील अश्वांची मोफत तपासणी व उपचार शिबिर आयोजित केले होते. त्यानंतर परिक्षण झालेल्या अश्वांमधून सुदृढ व निरोगी अश्वाला ‘अश्वराज ट्रॉफी’ उद्योजक कुंभारदरे यांच्या हस्ते देऊन अश्वमालकांचा गौरव करण्यात आला. यावेळी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात रवींद्र कुंभारदरे यांनी वरील विचार व्यक्त केले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष अजय आखाडे, सचिव संतोष रांदड, रो. डॉ. प्रकाश ठोके, रो. कुमार कोमटी, वाईचे पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. संतोष पांचपोर, शिरवळ येथील पशुसंवर्धन विद्यालयातील तज्ज्ञ डॉ. दुष्यांत मुगळीकर, डॉ. अजित माळी, महाबळेश्वर अश्व संघटनेचे अध्यक्ष जावेद खारकंडे, डॉ. बशीर डांगे आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिराच्या पहिल्या सत्रात येथील सुमारे १२५ अश्वांची तज्ञ व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकरवी तपासणी करण्यात आली. पंचायत समिती महाबळेश्वर पशुसंवर्धनचे डॉ. अजित माळी यांच्या मार्गदर्शनाखाली या वेळी अश्वांना मोफत जंताची औषधे, खनिज मिश्रणे व शक्तिवर्धक औषधे देण्यात आली.
महाबळेश्वर येथील अश्व हे येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचे तसेच त्यांच्या परिवाराचे आगळे वेगळे आकर्षण आहे. घनदाट जंगलामधून घोडे सवारी व प्रेक्षणीय स्थळांना भेटी हे येथील पर्यटकांचा आवडता विषय असतो. अशा वेळी निरोगी व सुदृढ घोडा सवारीसाठी मिळावा ही प्रत्येकाची अपेक्षा असते. त्यामुळेच रोटरी क्लब महाबळेश्वरतर्फे अश्व स्वास्थ्य, आरोग्य व सुदृढता यासाठी असा सारखी मोफत शिबिरे आयोजित केली जातात. त्याचा जास्तीत जास्त अश्वमालक फायदा घेत असतात, असे प्रास्ताविकात रोटरी अध्यक्ष अजय आखाडे यांनी सांगितले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत रोटरी पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. अश्वांची तपासणी येथील पालिकेच्या पेटीट लायब्ररी मैदानावर तसेच वेण्णालेक येथे करण्यात आली. यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक कार्यरत होते. त्यासाठी डॉ. संतोष पाचपोर, डॉ. दुष्यांत मुगळीकर, डॉ. लियाकत शेख, डॉ.गणेश आरडे, डॉ. बशीर डांगे, डॉ. राजू शेलार, डॉ. विलास काळे, डॉ. तेजस शेंडे, डॉ. विठ्ठल धायगुडे, डॉ. काविटकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
दुपारच्या सत्रात तपासणी झालेल्या सर्व अश्वांमधून परिक्षण करून सुदृढ, निरोगी व सशक्त अश्वांची निवड करण्यात आली. या वेळची रोटरी अश्वराज ट्रॉफी तमीज निजाम बेपारी यांच्या ‘विरा’ नावाच्या अश्वाला देण्यात आली. तिचे वितरण उद्योजक मा. नगरसेवक रवींद्र कुंभारदरे यांच्या हस्ते करण्यात आले. वाईचे पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. संतोष पंचपोर यांचे अश्वपालनात दैनंदिन निगा व काळजी कशी घ्यावी यावर व्याख्यान झाले. शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रकल्प प्रमुख महादेव जाधव, शिरीष गांधी, अॅड. वैशाली लोखंडे, ब्रिजभूषणसिंग, मनीष मुक्कावार, संजय बोधले यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास शहरातील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, अश्वप्रेमी, अश्वमालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2013 2:16 am

Web Title: corporator kumbhardare distributed ashwaraj trophy to bepari
Next Stories
1 ‘दुष्काळ निवारणात मोठा भ्रष्टाचार’ पश्चिम महाराष्ट्रातच ८० टक्के रक्कम खर्च- कांगो
2 स्टेट बँकेकडून धनगरवाडीला पाण्याची टाकी
3 विडी, तंबाखूवरील व्हॅटचा प्रश्न मंत्रिमंडळापुढे मांडण्याचे आश्वासन
Just Now!
X