दहीहंडी, गणेशोत्सवांच्या जाहिराती, कमानी, मंडप यासाठी रस्त्यांची मनसोक्त खोदाई केल्यानंतर आता नवरात्रोत्सवासाठी रस्ते मधोमध खोदण्याचे प्रकार सुरू झाले असून ऐरोलीत तर राष्ट्रवादीचे वादग्रस्त नगरसेवक एम. के. मढवी यांनी आपल्या मंडळाच्या नवरात्रत्सवात गरबा खेळण्यासाठी चक्क झाडांची कत्तल करून त्यांची रवानगी इतरत्र केली आहे. हे कमी म्हणून काय गरबा खेळताना भक्तांना अडथळा येऊ नये यासाठी चक् क रस्ताच्या मधोमध असलेला दुभाजक रातोरात गायब करून टाकण्यात आला आहे. त्यांच्या या कार्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू असून अनेक कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही अधिकाऱ्यांनी कानावर हात आणि तोंडावर बोट ठेवण्याची भूमिका घेतली आहे.
नवी मुंबई पालिकेचा पायपोस अद्याप एकमेकात नाही. त्यामुळे रस्त्यावर लागणाऱ्या कमानी, मंडप, जाहिराती यांच्यासाठी परवानगी घ्यावी लागते याचे सध्या कोणाला भान नाही. त्यामुळे उत्सव काळात जाहिराती, कमानी यांसाठी दिलेल्या सवलतीचा फायदा घेऊन शहरात विद्रुपीकरणाचा जणू काही स्पर्धा सुरू आहे. तरीही पालिकेचे प्रभाग अधिकारी कारवाई करताना दिसत नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांचे फावले असून नगरसवेकांनी तर आपल्या प्रभागाचा सातबारा आपल्या नावावर झाल्यासारखी वर्तणूक सुरू केली आहे. यात ऐरोलीतील एक नगरसवेक एम. के. मढवी आघाडीवर असून ते पालिकेच्या अधिकाऱ्यांना अजिबात जुमानत नसल्याचे चित्र आहे. पालिकेतील अतिक्रमण घोटाळ्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या मढवी यांनी दोन वर्षांपासून त्यांच्या करण मित्र मंडळाच्या वतीने ऐरोली सेक्टर आठ येथे नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेत ही घटस्थापना केली जाते. या काळात दणदणाट करणारा डीजे लावला जात असल्याने गरबा खेळणाऱ्यांची गर्दी या ठिकाणी चांगलीच जमत असल्याचे दिसून येते. त्यामुळे गरबा खेळण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने मढवी यांनी दोन दिवसांपूर्वी चक्क दोन रस्त्यांच्या मधोमध असणारा दुभाजक जेसीबी लावून उखडून टाकला. तेथील झाडे मुळासकट तोडून ती इतरत्र नेण्यात आली. त्यामुळे गरबा खेळण्यासाठी डांबरीकरणाचे मोठे मैदान मोकळे झाले आहे. जवळच्या रिक्षा चालकांनी मोठय़ा प्रेमाने लावलेली झाडे एका रात्रीत उखडून टाकण्यात आली. पालिकेने लाखो रुपये खर्च करून बांधलेला दुभाजक नेस्तनाबूत करण्यात आला. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक लोकांनी या कत्तलीविषयी प्रभाग अधिकाऱ्याकडे तक्रार केली पण त्यांनी कानात बोळे घातल्यासारखे केले. त्यामुळे दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न पडला आहे. झाडे लावण्यासाठी आमदार संदीप नाईक यांनी ग्रीन होप नावाची संस्था सुरू केली आहे. त्या अनुषंगाने लाखो झाडे लावली जात असताना त्यांच्याच पक्षाचा एक नगरसवेक झाडांची सर्वासमोर कत्तल करीत आहे. पालकमंत्री गणेश नाईक यांनीही समोरच्या पारसिक डोंगरावर झाडे लावण्यास प्रोत्साहन दिले आहे, पण त्यांचा कार्यकर्ता सिमेंटच्या जंगलात लावलेली चार झाडे गायब करीत आहे. मढवी यांच्याबद्दल अनेक नगरसेवकांची नाराजी आहे. ज्या झाडांचे आयुष्यमान जास्त आहे, त्या झाडांना इतरत्र हलविण्याचा प्रस्ताव वृक्षप्राधिकरण सभेत मंजूर झालेला आहे. त्याचाच आधार घेऊन या ठिकाणी असणारी वड, पिंपळ, जाभुळासारखी झाडे एमआयडीसीत हलविण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे येथील दुभाजकाचे दगड खराब झाले होते. त्यामुळे मंडळाच्या वतीने ते हटविण्यात आले असून तेथे पेव्हर ब्लॉक लावण्यात आलेले आहेत. नागरिकांना जर नव्याने दुभाजक हवा असेल तर तो मंडळाच्या वतीने पुन्हा बांधण्यात येईल यासाठी पालिकेचा कोणताही खर्च घेतला जाणार नाही. यापूर्वीचेही काम मंडळाच्या वतीने करण्यात आले होते, असे स्पष्टीकरण मढवी यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना दिले.