येथील तरूण नगरसेवक पुरब पद्मकांत कुदळे यांचे आज सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ३८ वर्षांचे होते. उद्या (गुरूवार) सकाळी साडेनऊ वाजता येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
घरगुती कामासाठी कुदळे आज नाशिकला गेले होते. तेथून आल्यानंतर सायंकाळी घरी संगणकावर काम करीत असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ते खाली कोसळले. त्यांचे वडील ज्येष्ठ नेते पद्माकांत कुदळे यांनी तातडीने डॉक्टरांना पाचारण केले, मात्र तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.
ते यांत्रिकी शाखेचे अभियंता होते. निवारा भागातून आमदार अशोक काळे यांच्या जनविकास आघाडीतून ते नगरपालिकेवर निवडून आले होते. नगरसेवकपदाची ही त्यांची दुसरी खेप होती. गेल्यावेळी ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले होते. या प्रभागात त्यांनी अनेक विकासकामे केली. त्यांच्या अनपेक्षित निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी त्यांच्या घरी धाव घेतली.