महापालिका प्रशासनाकडून विकासकामात अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी विकास आघाडीच्या नगरसेवकांनी बुधवारी महापालिकेच्या प्रवेशद्वारालाच टाळे ठोकून महापौर, उपमहापौरांसह अवघ्या प्रशासनालाच पाऊण तास कोंडले.  चच्रेअंती टाळे काढण्यात आले असले तरी प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यां नगरसेवकांविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
गुंठेवारी विकासासाठी १० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला असून या निधीतून स्वाभिमानी आघाडीचे बाळासाहेब गोंधळी या सदस्याने आपल्या प्रभागातील काही कामे सुचविली होती.  तसे पत्रही प्रशासनाला दिले होते. मात्र बुधवारी प्रसिद्ध झालेल्या निविदा सूचनेमध्ये ही कामे नसल्याचे पाहून गोंधळी संतप्त झाले.  त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकून आंदोलन सुरू केले. प्रशासन मागासवर्गावर जाणीवपूर्वक अन्याय करीत असल्याचा आरोप करीत पाऊण तास ठिय्या मारला होता.
या आंदोलना दरम्यान महापौर श्रीमती कांचन कांबळे, उपमहापौर प्रशांत मजलेकर आदींसह मुख्यालयातील सर्व कर्मचारी, अधिकारी महापालिकेच्या इमारतीत अडकले होते.  स्वाभिमानी आघाडीचे गटनेते शिवराज बोळाज यांनी या संदर्भात शहर अभियंता सोनवणे यांच्याशी संपर्क साधून चौकशी केली असता कामे राहिले असल्याची कबुली त्यांनी दिली.  या पुढील काळात असे प्रकार होणार नाहीत असे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचे बोळाज यांनी सांगितले. दरम्यान, महापालिकेला टाळे ठोकल्याप्रकरणी नगरसेवक बाळासाहेब गोंधळी यांच्याविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. प्रशासनाने ही तक्रार दाखल केली आहे.