गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरात डासांचा सुळसुळाट, तुंबलेल्या नाल्या, बंद पथदिवे, रस्त्यावरील खड्डे, काही भागात पाण्याचा अपुरा पुरवठा या व इतर नागरी समस्यांनी कळस गाठला असून नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेकडून आणि संबंधित काही प्रभागाच्या नगरसेवकांकडून कुठलेही प्रयत्न होत नसल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली असताना अनेक नगरसेवकांचे फोन बंद होते.
महापालिकेच्या दुर्लक्षामुळे सध्या शहरात नागरी समस्या मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. स्वच्छता पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून शहरात घाणीचे साम्राज्य दिसून येते. तुंबलेल्या नाल्या, बहुतेक भागातील रस्त्यांवरील खड्डय़ात साचलेले पाणी तसेच पावसामुळे सखल भागात निर्माण झालेली पाण्याची डबकी यामुळे शहरातील झोपडपट्टी भागासह काही सुशिक्षित वस्त्यामध्ये डासांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे. मंगळवारी रात्री अनेक वस्त्यांमध्ये आणि अपार्टमेंट पाणी साचले असताना नागरिक संबंधित प्रभागातील नगरसेवकांना दूरध्वनी लावत होते मात्र त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. महापालिकेच्या अग्निशामक विभागाचा दूरध्वनी सतत व्यस्त होता आणि दरम्यान कोणाचा फोन लागला तरी माणसे निघाली आहेत असेच उत्तर विभागाकडून दिले जात होते.  
आरोग्य विभागातर्फे स्वच्छता पाळण्याचे आवाहन केले जात असताना प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. आबालवृद्ध साथीच्या रोगांनी त्रस्त आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह अनेक खाजगी दवाखान्यात मलेरिया, गॅस्टोचे रुग्ण दाखल होऊ लागले आहेत. मात्र, तरीदेखील महापालिकेने अद्यापपर्यंत फॉगिंग मशीनने शहरातील अनेक भागात जंतुनाशक औषधांची फवारणी केलेली नाही. परिणामी डासांच्या व रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. डासांसोबतच शहरातील काही भागात  बंद असलेले पथदिवे ही एक प्रमुख समस्या नागरिकांना भेडसावत आहे. शहराबाहेरील महार्गावर आणि चौक हायमास्ट दिव्यांनी झळकावणाऱ्या महापालिकेला शहरातील ले आऊट आणि काही नगरातील नेहमी बंद असलेले पथदिवे बदलण्याची मात्र आवश्यकता वाटत नाही. पथदिवे बंद असल्याने अनेक भागात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. अनेक वेळा मागणी करूनही बंद दिवे बदलण्यात येत नाहीत, हे विशेष. वस्तीतील नगरसेवकांकडे एखादी समस्या घेऊन नागरिक जातात तर नगरसेवक तेवढय़ापुरते एखाद्या अधिकाऱ्याला फोन करून सांगतो मात्र समस्या सुटत नसल्याचा प्रकार बघायला मिळाला.
रस्त्यावरील खड्डे ही समस्या सध्या अनेकांना डोकेदुखी ठरली आहे. शहरातील सिमेंट रस्ते सोडले तर प्रत्येक डांबरी रस्त्यांवर खड्डय़ाचे साम्राज्य असल्यामुळे चांगला रस्ता शोधावा लागतो. गेल्या दोन तीन वर्षांत डय़ा भागात डांबरीरोड करण्यात आले आहे त्यातील एकाही रस्त्याचा दर्जा चांगला नाही. निकृष्ट रस्त्यांमुळे रस्ते लवकरच खराब झाले असून आता तर त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. जुन्यासह नव्या रस्त्यांचा दर्जा निकृष्ट असल्याने रस्त्यावर खड्डे की खड्डय़ात रस्ता हेच समजत नाही. भर पावसाळ्यात शहरातील मध्य नागपूर आणि पूर्व नागपुरातील  काही भागात अपुरा पाणीपुरवठा ही नागरिकांना भेडसावणारी आणखी एक समस्या आहे.
शहरातील समस्या बघता महापालिकेने अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कामाला लावले असले तरी असताना प्रत्यक्षात मात्र प्रशासन, नगरसेवक, विरोधी पक्ष या नागरी समस्या सोडविण्यासाठी कुठल्याही हालचाली करताना दिसत नाहीत त्यामुळे प्रत्येक नागरिक आम्ही कोणाकडे जावे? असा प्रश्न
विचारीत आहे.