येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णाच्या नातेवाइकाकडून साडेतीन हजार रुपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी डॉ. शेखर देशमुख याला रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ही कारवाई केली.
गेल्या १९ ऑगस्ट रोजी प्रभाकर सोपानराव होगे (वय ३२, नगरजवळा, मानवत) यांना छाती, गळा व कंबरेस जबर मार लागल्यामुळे गुरुवारी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शेखर देशमुख यांनी त्यांची तपासणी केली. मात्र, चांगले उपचार करण्यासाठी व दवाखान्यातून सुटी न देण्यासाठी रुग्णाचे मामा पांडुरंग घुले (इटाळी) यांच्याकडे डॉ. देशमुख याने साडेतीन हजार रुपये लाच मागितली. घुले यांनी लाचलुचपत विभागाकडे या बाबत तक्रार दिली. त्यानुसार शुक्रवारी रुग्णालयात सापळा लावण्यात आला. लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे, निरीक्षक दिवे, दंतुलवार आदींनी ही कारवाई केली. दरम्यान, शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने लाच मागितल्यास लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक डोंगरे यांनी केले.