सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. वांद्रे, कलानगर येथील बांधकाम खात्याच्या शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या वादग्रस्त कागदपत्रांची सध्या छाननी सुरू आहे. या कागदपत्रांच्या पडताळणीनंतर पुढील कारवाई केली जाईल, असे लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने स्पष्ट केले आहे.
नुकताच लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने वांद्रय़ाच्या कलानगर येथील शासकीय विश्रामगृहावर छापा घातला होता. या छाप्यात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या एमबी पुस्तिका, दलाल आणि अधिकाऱ्यांचे आर्थिक लागेबांधे असणारी अनेक कागदपत्रे सापडली आहेत. त्यामुळे आपण चौकशीच्या  
फेऱ्यात अडकू अशी भीती अधिकाऱ्यांमध्ये आहे. या कागदपत्रांची छाननी करून त्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभाग करीत आहे. तो अहवाल आल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल, असे लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सांगितले.
न केलेल्या कामाच्या निविदा काढणे, बोगस कामे करणे आदी गैरव्यवहार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहेत. अनेक कामे केवळ कागदोपत्री दाखवण्यात आलेली आहेत. ही सर्व प्रकरणे बाहेर निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनेक अधिकारी वर्षांनुवर्षे मुंबईत कसे कार्यरत आहेत तेसुद्धा या चौकशीतून बाहेर येणार असल्याने अधिकारी सैरभैर झालेले आहेत.