खुनाच्या गुन्हय़ात तक्रारदाराच्या बहिणीची साक्ष घेण्यासाठी, तसेच खटला विनाकारण प्रलंबित न ठेवण्यासाठी सत्र न्यायालयाच्या आवारात १० हजार रुपयांची लाच घेताना अंबाजोगाई (जिल्हा बीड) अतिरिक्त सत्र न्यायालयाचा सहायक सरकारी अभियोक्ता लालासाहेब नानासाहेब शिंदे याला गुरुवारी सकाळी न्यायालयाच्या केबिनमध्येच रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे अंबाजोगाई सत्र न्यायालयाच्या परिसरात चांगलीच खळबळ उडाली.
विलास नारायण ढाकणे (सारोळ, तालुका केज, जिल्हा बीड) यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्याप्रमाणे विभागाने लावलेल्या सापळय़ात शिंदे अडकला. तक्रारदार ढाकणे यांच्या मेहुण्याचा (सुभाष सारोक) ४ जून २०१० रोजी खून करण्यात आला. या प्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला. या गुन्हय़ासंबंधाने अंबाजोगाई सत्र न्यायालयात दाखल खटल्याची सुनावणी सुरू असून, साक्षीपुराव्याचे काम चालू होते. सरकारी पक्षातर्फे लोकसेवक लालासाहेब शिंदे काम पाहात आहे. गुरुवारी या गुन्हय़ाची सुनावणी ठरली होती. तक्रारदार ढाकणे यांची बहीण व सारोकची पत्नी कमल हिची साक्ष घेण्यासाठी, तसेच खटला विनाकारण प्रलंबित न ठेवण्यासाठी शिंदे याने ढाकणे यांच्याकडे १० हजार रुपये लाच मागितली होती. सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी लाचेची रक्कम सत्र न्यायालयाच्या आवारातील शासकीय केबिनमध्ये साक्षीदारांसमक्ष स्वीकारत असताना विभागाने लावलेल्या सापळय़ात शिंदे अलगद सापडला. लाचलुचपत विभागाचे औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सं. दे. बाविस्कर, अतिरिक्त अधीक्षक भा. ब. पिंगट यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक हरीष खेडकर, निरीक्षक विनय बहीर यांनी हा सापळा लावला.