News Flash

लाचखोर मुख्याध्यापक जाळय़ात

शिपायाची किरकोळ रजा मंजूर करण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या भूम तालुक्यातील आष्टा येथील शाळेच्या मुख्याध्यापक बबन दगडू थोरात यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले.

| January 17, 2013 01:38 am

शिपायाची किरकोळ रजा मंजूर करण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या भूम तालुक्यातील आष्टा येथील शाळेच्या मुख्याध्यापक बबन दगडू थोरात यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये दीपक चंद्रकांत कांबळे हे सेवक कार्यरत आहेत. कांबळे यांना दोन दिवसांची किरकोळ रजा हवी होती. कांबळे यांनी मुख्याध्यापकांकडे ४ व ५ जानेवारी रोजी किरकोळ रजा मिळावी, असा लेखी अर्ज केला. दि. ६ जानेवारीला रविवार असल्याने ७ जानेवारीला ते शाळेत हजर झाले. त्यानंतर हजेरीपुस्तिकेवर सही करीत असताना दोन दिवसांची किरकोळ रजा मुख्याध्यापकांनी नामंजूर केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कांबळे यांनी मुख्याध्यापक थोरात यांना रजा का मंजूर केली नाही, असे विचारले. त्यावर थोरात यांनी रजा मंजुरीसाठी दोन हजार रुपये व विद्यालयाच्या आवारात स्वच्छतागृह बांधण्यासाठी दोन हजार असे ४ हजार रुपये द्यावे लागतील. त्यानंतर तुझे सर्व प्रकरण निकाली काढतो, असे सांगितले. त्यानंतर कांबळे यांनी उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून याबाबत तक्रार दिली.
विभागाने बुधवारी विद्यामंदिर हायस्कूल येथे सापळा रचून दुपारी साडेबाराच्या सुमारास लाच घेताना मुख्याध्यापक थोरात यास पकडले. पोलीस उपअधीक्षक एस. आर. भांडवले, पोलीस निरीक्षक एफ. सी. राठोड व त्यांचे सहकारी दिलीप भगत, अश्विनकुमार जाधव, दीपक आवारे, महादेव स्वामी, नितीन तुपे, राजाराम चिखलीकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 1:38 am

Web Title: corrupted principal gets arrested
टॅग : Arrest,Principal
Next Stories
1 पालकमंत्र्यांविरोधात सेना सदस्य सरसावले
2 पाली भाषा विभागाचे प्रमुख डॉ. कुऱ्हाडे अखेर निलंबित
3 मित्रगोत्री यांच्या विरोधातील ठराव बारगळण्याची शक्यता!
Just Now!
X