औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रियेत कमालीचा निष्काळजीपणा केला जात असल्याच्या निषेधार्थ सोमवारी भारतीय विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील प्राचार्याच्या दालनात ठिय्या मारून आंदोलन केले. शनिवापर्यंत गुणवत्ता यादी जाहीर न झाल्यास प्रशिक्षण संस्थेतील कामकाज बंद पाडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
शासनाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वेगवेगळ्या शिक्षणक्रमांना प्रवेश घेण्याची प्रक्रिया यंदापासून ‘ऑनलाइन’ केली आहे. आधी प्रवेश अर्ज भरताना दमछाक झालेल्या विद्यार्थ्यांचे कित्येक दिवसांपासून गुणवत्ता यादी जाहीर होण्याकडे लक्ष लागले आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार ही यादी मागील आठवडय़ात जाहीर होणे क्रमप्राप्त होते, परंतु ती जाहीर झाली नाही. शनिवारी भारतीय विद्यार्थी सेनेने सातपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत यादी जाहीर करण्याबद्दल निवेदन दिले होते. त्या वेळी गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर केली जाईल, असे सांगण्यात आले. परंतु या दिवशीही यादी जाहीर झाली नाही.
यामुळे विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश बेलदार, महानगरप्रमुख संदीप गायकर व उपमहानगरप्रमुख अमोल इजे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी संस्थेचे प्राचार्य एन. यू गांगुर्डे यांच्या दालनात ठिय्या दिला. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वेगवेगळ्या ३६ शिक्षणक्रमांसाठी २७४३ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहे.
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फायदा होण्याऐवजी तोटाच अनुभवण्यास येत आहे. गुणवत्ता यादी जाहीर होत नसल्याने विद्यार्थ्यांची अस्वस्थता वाढली आहे. दुसरीकडे अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्णत्वास गेल्यामुळे त्यांना प्रवेशाबद्दल संदिग्धता आहे. सहसंचालक पी. शिंपले यांनी केंद्रात धाव घेऊन कार्यकर्त्यांची समजूत काढली. ‘सव्‍‌र्हर डाऊन’ झाल्यामुळे गुणवत्ता यादी जाहीर होण्यास विलंब झाला आहे. पुढील चार ते पाच दिवसांत हा तांत्रिक दोष दूर करून यादी जाहीर केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.