कुर्ला भाभा रुग्णालयातील बाह्य़ रुग्ण इमारतीसाठी खरेदी केलेल्या साहित्याची बिले सात वर्षांनंतरही लेखा विभागाला पडताळणीसाठी उपलब्ध झालेली नाही. मात्र या साहित्याचे पैसे अदा करण्यात आल्याचे निदर्शनास आले असून या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेकडून करण्यात आली आहे.
कुर्ला भाभा रुग्णालयाच्या बाह्य़ रुग्ण इमारतीचे उद्घाटन २००९-१० या काळात करण्यात आले. या दोन मजली बाह्य़ रुग्ण इमारतीसाठी आवश्यक असलेले रुग्णालयीन साहित्य खरेदी करण्यात आले होते. त्यामध्ये लोखंडी पलंग, खुच्र्या, गाद्या, उशा, चादरी, पडदे, ट्रॉली आदींचा समावेश होता. सहा वर्षे झाली तरी या साहित्याची रुग्णालयाच्या भांडार विभागात या साहित्याची नोंद करण्यात आलेली नाही. उलटपक्षी बिले नसताना साहित्याचे पैसे अदा करण्यात आल्याचा आरोप म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष सुनील चिटणीस यांनी केला आहे. या संदर्भात पालिका आयुक्त अजय मेहता यांना पत्र पाठवून तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी चिटणीस यांनी केली आहे.