पनवेल महसूल विभागाच्या सेतू केंद्रातून त्वरित दाखला मिळण्यासाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना लुटण्याचा प्रकार सध्या दलालांकडून सुरू आहे. प्रत्येक शैक्षणिक दाखल्यासाठी हे दलाल विद्यार्थ्यांकडून तीन हजार रुपये उकळत असून दोन दिवसांत हे अर्ज मिळत असल्याने दलालांच्या दुकानांवर विद्यार्थ्यांची गर्दी वाढल्याचे पाहावयास मिळत आहे. सेतू केंद्रातील भ्रष्ट कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हे प्रकार सर्रास सुरू असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल काही विद्यार्थ्यांकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
तालुक्यात दहावीचे शिक्षण देणाऱ्या एकूण ९९ शाळा आहेत, तर सात महाविद्यालये आहेत. यंदा दहावीचे नऊ हजार ३५७ मुले उर्तीण झाली आहेत. तर बारावीमध्ये साडेपाच हजार विद्यार्थी उर्तीण झाले आहेत. विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी व शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी जात, आधिवास, उत्पन्न, दुर्बल घटक असे दाखले अनिवार्य आहेत. हे दाखले प्रवेश मिळण्यापूर्वी आपल्या हातात पडावेत अशी पालकांची व विद्यार्थ्यांची अपेक्षा असते. पनवेलच्या महसूल विभागाच्या सेतू केंद्रात त्यासाठी यंत्रणाही उभारण्यात आली आहे; परंतु एकाच वेळी सेतू केंद्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लोंढय़ामुळे सेतू केंद्रातून १० ते पंधरा दिवसांचा अवधी एका दाखल्यासाठी लागेल असे ठळक अक्षरात सेतू केंद्रात अधोरेखित केले आहे. याच ठळक पाटीचा लाभ पनवेलच्या सेतू केंद्रातील काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी घेऊन प्रती दाखला तीन हजार रुपयांत हातात आणून देण्याची शक्कल येथे लढविली आहे. पंचायत समिती सदस्य नीलेश पाटील यांनी अशाच एका दलालाचे मोबाइलवरुन चित्रीकरण करून भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे.

तक्रार आल्यास कारवाई करू -तहसीलदार
सेतू केंद्रात होणाऱ्या या कारभाराविषयी पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांनी कोणताही भ्रष्ट कारभार विद्यार्थ्यांच्या दाखल्यात होत नसल्याचे म्हटले आहे. आजपासून पनवेलमधील ग्रामीण भागात पालेखुर्द गावात शैक्षणिक विविध दाखल्यांचे वाटप सुरू केल्याचे सांगून पनवेल तालुक्यातील सहा विभागीय केंद्रांमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मागणीनुसार दाखले देणार असल्याचे सांगितले. कोणीही व्यक्ती सेतू केंद्राच्या नावावर विद्यार्थ्यांकडून पैसे उकळत असल्यास त्याबाबतची तक्रार विद्यार्थ्यांनी अथवा पालकांनी थेट तहसीलदार कचेरीत येऊन करावी, त्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे आकडे यांनी सांगितले.