कॉस्मो फिल्म्स्मधील माथाडी कामगारांनी थकलेल्या पगाराचे दिवाळीपूर्वी वाटप करण्यासाठी कंपनीसमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. आठ महिन्यांपूर्वी माथाडी कामगारांच्या पगारात कंपनी व्यवस्थापनाने एकतर्फी क पात केली. मागील सहा वर्षांपासून मिळत असलेल्या पगारात एकतर्फी कपात केल्याने माथाडी कामगारांची आर्थिक कोंडी झाल्याचे सुभाष लोमटे यांनी सांगितले. थकीत पगाराचे वाटप माथाडी कामगारांना न केल्यास सर्व माथाडी कामगार बेमुदत उपोषण करतील, असा इशारा मराठवाडा लेबर युनियनचे अ‍ॅड. सुभाष गायकवाड यांनी दिला. संघटना गेल्या ८ महिन्यांपासून सामोपचाराने प्रयत्न करीत असून हा प्रश्न न सुटल्याने नाइलाजाने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. कंपनी व्यवस्थापनाच्या आडमुठय़ा धोरणामुळे माथाडी कामगारांत प्रचंड असंतोष धुमसत असल्याने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण हा त्याचाच भाग असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. व्यवस्थापनाने आपली भूमिका बदलून माथाडी कामगारांना दिवाळीपूर्वी थकीत पगार द्यावा, अशी मागणी संघटनेने केल्याचे सांगितले. छगन गवळी, अरविंद बोरकर, पी. एम. मेटे, मामा साळुंके, प्रकाश ससाणे, शेख फरीद आदींसह ५० माथाडी कामगार उपोषणात सहभागी होते.