23 September 2020

News Flash

किरकोळीच्या भाजीला घाऊक दरांची फोडणी

पावसाळा सुरू होताच ताज्या, हिरव्यागार भाज्यांची स्वस्ताई प्रत्यक्षात अवतरेल आणि महागाईचे चटके काहीसे कमी होतील, अशी आशा बाळगणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांचा किरकोळ बाजारात सुरू झालेल्या दरांच्या

| June 15, 2013 12:51 pm

पावसाळा सुरू होताच ताज्या, हिरव्यागार भाज्यांची स्वस्ताई प्रत्यक्षात अवतरेल आणि महागाईचे चटके काहीसे कमी होतील, अशी आशा बाळगणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांचा किरकोळ बाजारात सुरू झालेल्या दरांच्या ‘घाऊक’ पॅटर्नमुळे भ्रमनिरस होऊ लागला आहे. पुणे, नाशिक जिल्ह्य़ांतून मुंबईच्या घाऊक बाजारात आयात होणाऱ्या भाज्यांचे दर काहीही असोत मोठय़ा किरकोळ मंडय़ांमध्ये गवार, भेंडी, फरसबी, टॉमेटो, वांगी, ढोबळी मिरची अशा प्रमुख भाज्या किलोमागे ६० ते ८० अशा ‘फिक्स रेट’नुसार विकल्या जाऊ लागल्याने किरकोळ बाजारातील महागाई कधी कमी होणार, असा सवाल ग्राहक उपस्थित करू लागले आहेत. विशेष म्हणजे, आवक मंदावल्याने एपीएमसीच्या घाऊक बाजारात उत्तम प्रतीचा टॉमेटो किलोमागे ३६ रुपयांनी विकला जात असताना वाशी, ठाण्यातील काही किरकोळ बाजारात हाच दर ८० ते ९० रुपयांपर्यंत पोहचल्याचे चित्र दिसत आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईतील भाजीपाल्याच्या व्यापारावर होत असल्याचे चित्र दिसत आहे. मुसळधार पावसात एपीएमसीच्या घाऊक बाजारपेठेत खरेदीसाठी येणारे ग्राहक कमी झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच पुणे, नाशिक जिल्ह्य़ांमधून वाशी बाजारात खराब भाजीपाला येण्याचे प्रमाणही वाढले आहे. या पाश्र्वभूमीवर बाजारातील घाऊक दर अजूनही स्थिर आहेत, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
किरकोळ बाजारात मात्र नेमके उलट चित्र दिसू लागले असून पावसाचा बागुलबूवा उभा करून भाज्यांचे दर वाढविले जात असल्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत. मध्यंतरी स्थानिक संस्था करामुळे भाजी महाग असल्याची ओरड किरकोळ विक्रेत्यांनी सुरू केली होती. प्रत्यक्षात भाजीपाल्यावर स्थानिक संस्था कराची आकारणी होत नाही. तरीही एलबीटीचा बागुलबूवा उभा केला जात होता. उन्हाळ्यामुळे राज्यात दुष्काळाच्या झळा जाणवत होत्या. त्यामुळे दुष्काळामुळे मुंबईकरांची भाजी महागली, असे कारण पुढे केले जात होते. पावसाळा सुरू झाल्यावर हे चित्र बदलेल, असे एकीकडे सांगितले जात होते. प्रत्यक्षात राज्यभर पावसाने दमदार हजेरी लावूनही भाज्या महाग विकल्या जाऊ लागल्यामुळे ग्राहक चक्रावले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील प्रमुख भाजी मंडय़ांमध्ये भेंडी, गवार, फरसबी, शेवगा शेंग, वांगी, फरसबी अशा प्रमुख भाज्या ६० रुपये किलो अशा ‘फिक्स रेट’ने विकल्या जाऊ लागल्या आहेत. महत्त्वाच्या भाज्यांपैकी कोणतीही भाजी निवडा दर सारखाच, असा घाऊक ‘पॅटर्न’ या बाजारांमधील विक्रेत्यांनी अवलंबिण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसू लागले आहे.

टॉमेटो मात्र महाग
गेल्या काही दिवसांपासून टॉमेटोची आवक कमी झाल्यामुळे घाऊक बाजारात उत्तम प्रतीचा टॉमेटो किलोमागे ३६ रुपयांनी विकला जाऊ लागला आहे. एरवीच्या तुलनेत हे दर अधिक असून किरकोळ बाजारात टॉमेटोच्या किमती ७० ते ८० रुपयांच्या घरात पोहचल्याचे दिसून येते. किरकोळ बाजारातील फिक्स रेटचे सूत्र चढय़ा भावाने विकल्या जाणाऱ्या टॉमेटोला लावण्यात आलेले नाही, हे विशेष.

* घाऊक बाजारातील भाज्यांचे दर आणि किरकोळीचे दर यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे, अशी कबुली एपीएमसीचे उपसचिव अविनाश पाटील यांनी वृत्तान्तला दिली. घाऊक बाजारात हमाली, बाजार फी, वाहतूक खर्च तसेच मालाची नासाडीचे प्रमाण लक्षात घेतले तरी ३६ रुपये किलोचा टॉमेटो किरकोळ बाजारात ५० ते ५५ रुपयांपर्यंत मिळायला हवा. मात्र, काही ठिकाणी ७० रुपयांनी विक्री होत आहे. ते योग्य नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2013 12:51 pm

Web Title: costly vegetable market
टॅग Costly
Next Stories
1 मिठागर कामगारांचा सत्याग्रह; न्यायासाठी सिडकोवर धडक
2 ठाण्यातील रस्त्यांना श्रीमंती थाट ; कळवा, मुंब्र्याच्या तुलनेत पार्किंग महाग
3 आता रिमोट सेन्सिंगद्वारे पाणी मीटर वाचन..
Just Now!
X