कापसासाठी मराठवाडय़ात प्रसिद्ध असलेल्या परभणी जिल्हय़ात कापूस पणन महासंघाच्या वतीने परभणीसह मानवत येथे कापूस खरेदीला प्रारंभ केला खरा; पण सरकारपेक्षा खासगी बाजारात भाव अधिक असल्याने एकही कापूस उत्पादक शेतकरी या खरेदीकडे फिरकला नाही. परिणामी, कापूस पणन महासंघाला केवळ ‘काटापूजन’च करावे लागले.
गंगाखेड रस्त्यावरील व्यंकटेश जिनिंग येथे कापूस पणन महासंघाच्या खरेदीला प्रारंभ झाला. मानवत येथे कापूस पणन महासंघ संचालक पंडित चोखट यांच्या हस्ते खरेदी सुरू झाली. औपचारिकरीत्या हा समारंभ पणन महासंघाला उरकावा लागला. खासगी बाजारात कापूस ४ हजार २०० रुपयाने खरेदी केला जात असताना महासंघाच्या वतीने ३ हजार ९०० रुपयांत खरेदी होत असल्याने शुभारंभाच्या दिवशीही महासंघाच्या खरेदी केंद्रावर शुकशुकाट होता.
दरम्यान, आता गुरुवारी (दि. २२) जिंतूर, गंगाखेड, लिमला, हिंगोली, मार्डी (तालुका औंढा) येथे महासंघाची खरेदी सुरू होणार आहे. शुक्रवारी (दि. २४) सोनपेठ, पाथरी, सेलू, सेनगाव येथे खरेदी सुरू होणार असल्याचे राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक एस. डी. दळवी यांनी स्पष्ट केले. त्यातही ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी कार्यालयाचे कर्मचारी अधिकृत केले असल्याने महासंघाची खरेदी २१, २५ व २६ नोव्हेंबरला बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले.
राज्यात सरकारने पणन महासंघाच्या वतीने १०९ ठिकाणी खरेदी केंद्रे उघडण्याचा निर्णय घेतला असला, तरी खासगी व्यापारी ४ हजार २०० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलने खरेदी करीत असल्याचे कोणीही महासंघाकडे कापूस घालण्याच्या मन:स्थितीत नाहीत.