कापसाला अपेक्षित नसलेला बाजारभाव आणि दुसरीकडे बहुतांश कापसाची झालेली वेचणी या पाश्र्वभूमीवर कापसाचा हंगाम आता संपल्यात जमा आहे. परंतु कापूसउत्पादक शेतकऱ्यांना मात्र यंदा लागवडीसाठी झालेला खर्च भरून निघतो की नाही, या चिंतेने ग्रासले आहे. दरम्यान, परभणीच्या बाजारपेठेत आतापर्यंत ५८ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाल्याचे वृत्त आहे.
यंदा कापसाचे भाव साडेचार हजार रुपयांवरच स्थिरावले. कापसाचा हंगामही आवरल्यात जमा आहे. बीटी कपाशीचा दोन वेचण्यांतच झाडा होतो. एकाच वेळी सगळीकडचा कापूस फुटत असल्याने कापूस वेचणीसाठी महिला मजुरांचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण होतो. यंदा दोन वेचणीतच कापसाचे पीक आटोपले. आधीच उत्पादन कमी, बाजारभावातही मोठी घट अशा संकटात सापडलेल्या कापसाची आवक घटत चालली आहे. परभणी बाजार समितीमध्ये आतापर्यंत ५८ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही खरेदी कमी असून मागील वर्षी ७ डिसेंबपर्यंत ६० हजारांचा आकडा ओलांडला होता. दरम्यान, उत्पादन कमी असतानाही दर मात्र स्थिर आहेत.
परभणी जिल्ह्यात प्रामुख्याने घेण्यात येणारे कापूस हे पीक येथील शेतकऱ्यांना यंदा मात्र अडचणीत आणणारे ठरत आहे. उत्पादन चांगले झाल्यास दरात घसरण आणि कमी झाल्यास तेवढेच दर कायम राहात आहेत. दोन वर्षांपासून कापसाला नसíगक संकटाचा विळखा पडत आहे. या वर्षी अतिवृष्टीतून तग धरलेल्या कापसावर लाल्या रोगाने मात्र घाला घातला आणि कापूस उत्पादकांच्या उरल्या सुरल्या आशा संपल्या. लाल्याचा एवढा कहर झाला की, दोन वेचण्यातच कापसाच्या पराटय़ा पाहायला मिळाल्या.
बाजारपेठेतही यंदा कापसाचे दर स्थिर राहिले आहेत. पाच हजारांच्या पुढे कापूस जाईल अशी अपेक्षा होती. पंरतु सध्याचे स्थिरावलेले दर आणि घटणारी आवक लक्षात घेता आता दर वाढणार नाहीत, असेच चित्र आहे. परभणी बाजारपेठेसह जिल्हाभरात ४ हजार ८०० रुपयांपर्यंत कापसाची खरेदी सुरुवातीपासून झाली. हेच दर आजही कायम आहेत. परभणी बाजार समितीच्या वतीने ७ डिसेंबपर्यंत ५८ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. चालू हंगामात कापसाला सर्वाधिक ४ हजार ८५१ रुपये, तर सर्वात कमी ४ हजार ५५१ रुपये दर मिळाला. याच दराने अजूनही खरेदी सुरू आहे. ज्यांना आíथक चणचण भासत होती, अशांनी तत्काळ कापूस विकून टाकला. मोठ-मोठे कापूस उत्पादक अजूनही दरवाढीची अपेक्षा बाळगून आहेत. मुळात उत्पादन घटल्याने आणखी कापसाची आवक होणार नाही हे चित्र स्पष्ट आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी आपला कापूस व्यापाऱ्यांना विकला आहे. कापूस उत्पादकांना जास्त काळ भावासाठी थांबून राहणे परवडत नसल्याने आहे त्या भावात कापसाची विल्हेवाट लावावी लागते. जो कापूस शेतातून निघाला आहे, त्यातला किमान ७० टक्के कापूस बाजारपेठेत आला असून फारच मोजक्या शेतकऱ्यांनी कापूस शिल्लक ठेवला आहे.