कापूस पणन महासंघातर्फे सोमवारी सुरू केलेल्या कापूस खरेदीला केवळ काटा पुजनावर समाधान मानावे लागले. परभणी विभागात महासंघाच्या वतीने चार ठिकाणी कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. मात्र, या चारही ठिकाणी कोणत्याच शेतकऱ्याने कापूस न आणल्याने त्या ठिकाणी केवळ काटापूजन करावे लागले.
खासगी बाजारपेठेपेक्षा महासंघाचे दर कमी असल्याने शेतकऱ्यांनी महासंघाच्या खरेदीकडे पाठ फिरवली. दरम्यान, सीसीआयने मानवत येथे लिलावाद्वारे खरेदी प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवून ४ हजार ७०० रुपये प्रतििक्वटलने कापसाची खरेदी केली. महासंघाच्या वतीने राघवेंद्र जििनग-मानवत, वर्धमान जििनग-जिंतूर, व्यंकटेश जििनग-परभणी, नर्मदेश्वर जििनग- िहगोली या ठिकाणी काटा पूजन करण्यात आले. शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणावा, असे आवाहन केले होते. तथापि शेतकऱ्यांनी चारही केंद्रांवर कापूस आणला नाही. त्यामुळे खरेदी केंद्रावर कोणीही फिरकले नाही. दरम्यान, सरकारने कापसाच्या प्रतवारीनुसार ३ हजार ८०० ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटल असे कापसाचे दर घोषित केले. खासगी बाजारपेठेत दर जास्त असल्याने तूर्त तरी शेतकऱ्यांचा कल खासगी बाजारपेठेकडेच आहे. त्यामुळेच पणन महासंघाच्या खरेदी केंद्रावर प्रतिसाद मिळाला नाही, असे महासंघाचे प्रभारी विभागीय व्यवस्थापक ए. व्ही. मुळे यांनी सांगितले.
दरम्यान, या वर्षी ‘सीसीआय’ने (केंद्रीय कापूस मंडळ) लिलाव प्रक्रियेद्वारे कापूस खरेदीत प्रवेश केला. मानवत येथे सीसीआयने केलेल्या खरेदीला ४ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात आला. सीसीआयने थेट कापूस खरेदी प्रक्रियेत सहभाग नोंदविल्याने शेतकऱ्यांना आता चांगला भाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कापूस खरेदीत सीसीआय उतरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. गतवर्षी सीसीआयने जिल्ह्यात केंद्र सरकारच्या हमी भावानुसारच खरेदी केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना गतवर्षी अपेक्षित भाव मिळाला नाही. यंदा मात्र मानवत येथे सीसीआय खुल्या स्पध्रेत उतरल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला. परभणी येथेही गेल्या दोन दिवसांपासून सीसीआयच्या अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा काही जििनग मालकांशी संपर्क होता. मात्र, जििनग मालकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने परभणीतील सीसीआयच्या खरेदीसमोर प्रश्नचिन्हच आहे.