महापालिकेच्या जुन्या कौन्सिल हॉलला लागलेल्या आगीमागे निष्काळजीपणा हेच एकमेव कारण दिसते आहे, पण वस्तुस्थिती तशी नसावी असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच बहुधा प्रशासनाने चौकशी समिती वगैरे नियुक्त करून रितसर कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. कोणाला तो फार्स वाटण्याची शक्यता आहे, मात्र त्यामागे कारणेही तशीच आहेत.
भरमध्यवस्तीत असलेल्या या मोक्याच्या भूखंडावर अनेकांचा डोळा आहे. काहींना ती सामाजिक कामासाठी हवी आहे तर काहींना धार्मिक कारणांसाठी! मनपाची नवी प्रशासकीय इमारत झाल्यापासून ही जुनी इमारत तशी विनावापरच आहे. इमारत अत्यंत जुनी आहे, बहुतेक काम जुन्या पद्धतीचे आहे. त्यात लाकडाचा मुबलक वापर आहे. लक्ष दिले नाही तर आणखी काही वर्षांत सगळी इमारत आपोआप जमीनदोस्त होईल अशी स्थिती आहे.
मनपाचे नव्या प्रशासकीय इमारतीत स्थलांतर झाले आणि या जुन्या इमारतीच्या जागेकडे अनेकांचे लक्ष लागले. शहरातील एका जुन्या संस्थेने लगेचच त्या जागेवर हक्क सांगण्यास सुरूवात केली. सरकारने त्याकाळी ही जागा सामाजिक, शैक्षणिक कामासाठी दिली होती. स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालयाची गरज लक्षात घेऊन तत्कालीन संस्थाचालकांनी ही जागा नगरपालिका कार्यालयासाठी दिली. आता मनपाच्या नव्या प्रशासकीय इमारतीमुळे जागेची गरज राहिलेली नाही, त्यामुळे ही जागा परत मिळावी असे त्या संस्थेचे म्हणणे आहे. तशी मागणी त्यांनी काही बडय़ा लोकांना मध्यस्थ म्हणून तयार करून सुरू केली आहे. त्यासाठी जुनी कागदपत्रेही शोधली जात आहेत.
मनपाला ही मागणी अर्थातच मान्य नाही. जागा सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालयासाठी दिली असल्याचा पुरावा मनपाकडे आहे. मात्र यासंबधी आजउद्या कधी ना कधी न्यायालयीन दावे होणार हे नक्की आहे. इमारत बऱ्यापैकी चांगली व प्रभाग कार्यालयासाठी म्हणून का असेना पण वापरात असल्याने दावा पक्का होण्यात अडथळा होता, तो दूर व्हावा म्हणून काही करण्यात आले का अशी शंका व्यक्त होते आहे.
दुसरा मुद्दा धार्मिक आहे. यापुर्वीही एकदा तो अचानक पुढे आला होता. या जुन्या इमारतीच्या एका कोपऱ्यातील जागेत जुने धार्मिक स्थळ आहे. तिथे रितसर पूजाअर्चा, जत्रायात्रा वगैरे नियमीतपणे होत असते. पूर्वी कधीकाळी त्याबाबतचे तोंडी िंकंवा लेखी करारमदार झाले असतील, नसतील पण गेल्या अनेक वर्षांपासून हे सुरू आहे. ते फक्त तेवढय़ापुरतेच मर्यादीत होते, पण काही वर्षांपुर्वी त्या जागेवर ताबाच मागितला गेला. तत्कालीन आयुक्तांनी तो तोंडीच मान्य करून संबधितांना त्या जागेत नळजोड वगैरे गोष्टी अधिकृत करून देण्याचा आदेश दिला.
या आदेशानंतर ते काम युद्धपातळीवर सुरू झाले. नळजोडासाठी स्वतंत्र वाहिनी टाकण्यात आली. त्या जागेवर मोठा फलक लागला. रंगरंगोटी सुरू झाली. त्यावेळी विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांच्या लक्षात ही गोष्ट आली व त्यांनी लगेचच विरोध सुरू केला. त्यात सर्वात पहिली गोष्ट झाली ती म्हणजे त्या जागेला कुलूपच लागले. नंतर प्रभारी उपायुक्त संजीव परशरामे यांच्यावर विनाकारण कारवाई झाली. नंतर ती मागे घेण्यात आली, मात्र त्यांच्या सव्‍‌र्हिस पुस्तकात तो लाल शेरा पडला तो पडलाच! सेनाभाजपने विषय वाढवला. तीव्र विरोध सुरू केला. सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीवर टिका सुरू केली. नंतर ते कामही बंद पडले व विषयही बासनात गेला तो गेलाच!
काहीतरी निमित्त काढून तो वरती आणण्याचा प्रयत्न आगीमागे आहे का अशीही चर्चा आता सुरू आहे. सध्या मनपातील सत्ता सेनाभाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे या चर्चेला जोर आहे. ते तसेच आहे असे उघडपणे सांगण्यात येत असते. त्याला पुष्टी म्हणून नळजोडसाठी स्वतंत्र जलवाहिनी दिल्याची ही जुनी घटना सांगितली जाते. हे जाणून घेण्यासाठीही चौकशीची गरज आहे.
आगीचे कारण शोधायचे असेल तर त्या समितीत अग्निशमन दलाच्या प्रमुखाचा समावेश असायलाच हवा ही साधी गोष्ट असताना समितीत अग्निशमन दल विभाग प्रमुख कशासाठी म्हणून गदारोळ केला गेला. ते स्वत:हून बाजूला झाले, पण आता त्या समितीत आग या विषयाचा एकही तज्ञ नाही याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही.
आग लागल्यानंतर थोडय़ाच वेळात महापौरांसह अनेक पदाधिकारी व नगरसेवक तत्काळ आगीच्या ठिकाणी उपस्थित झाले. आयुक्त व अन्य प्रमुख अधिकारीही आले. नागरिकांचीही गर्दी झाली होती. आग विझवण्याच्या कामात अनेकांनी सहभागही घेतला. असे असून चौकशी समितीसमोर जबाब देण्यास एकटय़ा उपमहापौर वगळता एकही पदाधिकारी उपस्थित झाला नाही. अन्यही कोणी आले नाही. ‘सीआयडी चौकशी झाली पाहिजे’, ‘आग लागली नाही तर लावली गेली’, ‘त्यात यांचायांचा हात आहे’ असा बोलघेवडेपणा करणारेही जबाबासाठी फिरकले देखील नाहीत. समितीने आता झालेल्या चौकशीतून काय तो निष्कर्ष काढावा व प्रशासनाने सभागृहाच्या नुतनीकरणाच्या कामाला लागावे. त्यासाठी प्रमोद कांबळे, अशोक डोळसे आदी शिल्पकार, चित्रकारांनी मनपाला मदत करण्याची तयारी दाखवली आहेच.
मानकरी
मुख्य स्वच्छता निरीक्षक शेख इम्तियाज म्हणजे सभ्यता, सुसंस्कृतपणा याचा मूर्तीमंत आविष्कार आहेत. सलग ३३ वर्षे आरोग्य खात्यात सेवा देणारे इम्तियाज जुलै २०१३ मध्ये निवृत्त होतील. सफाई कर्मचाऱ्यांमध्येही ते प्रिय आहेत. एखाद्या वसाहतीमधील खासगी असलेले स्वच्छतेचेही कामही त्याचा फारसा बाऊ न करता ते मनपा कर्मचाऱ्यांच्या मदतीने लागलीच करून देतात. धार्मिक वृत्तीच्या इम्तियाज यांचे ‘कामाशी अत्यंत प्रामाणिक’ हेही एक वैशिष्टय़ आहे.