पालिकेतील जमा-खर्चाचा विचार करताना पालिकेत झालेल्या अतिक्रमण घोटाळ्याचाही विचार करण्यात यावा अशी टीका सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे एक नगरसेवक गणेश म्हात्रे यांनी केल्यानंतर या घोटाळ्यातील आरोपी नगरसेवक एम. के. मढवी यांनी थेट आमदार संदीप नाईक यांच्यावर टिप्पणी केल्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व विरोधक शिवसेना व भाजप युतीच्या नगरसेवकांनी मंगळवारी तब्बल दोन तास पालिकेच्या सभागृहात गोंधळ घातला. माफी मागा, इतिवृत्तांताची टेप वाजवा यांसारख्या मानापमान नाटय़ात शहराच्या भल्याचा विचार यावेळी मागे पडला होता. त्यामुळे २०० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या मुख्यालयात नगरसेवक घालत असलेला तमाशा पाहण्याची वेळ नवी मुंबईकर नागरिकांवर आली आहे.नवी मुंबई पालिकेच्या आर्थिक स्थितीवर चर्चा करण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने दोन दिवसीय विशेष सभेचे आयोजन केले होते. या सभेत लेखा विभागाने २० वर्षांतील खर्च आणि जमा यांचा ताळेबंद ठेवला होता. २० वर्षे सत्तेवर राहिलेल्या शिवसेना, नागरी विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोणत्या कामांवर उधळपट्टी केली आहे याचा पंचनामा विरोधी पक्षाला करण्याची एक संधी सत्ताधारी पक्षाने दिली होती. ही एकप्रकारे आर्थिक श्वेतपत्रिका होती. पालिकेने अवास्तव, अवाढव्य, अवाजवी केलेल्या खर्चाची उदाहरणे देऊन सत्ताधारी पक्षाला कात्रीत पकडण्याची ही संधी विरोधकांनी बेछूट आरोपांमुळे वाया घालविल्याचे चित्र निर्माण झाले. पालिकेच्या आर्थिक स्थितीवर चर्चा करताना पोलीस दप्तरी नोंद झालेल्या घोटाळ्यांचीही चर्चा केली गेली पाहिजे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणेश म्हात्रे यांनी लगावला असता पालिकेच्या अतिक्रमण घोटाळ्यात तुरुंगवास भोगणाऱ्या नगरसेवक एम. के. मढवी यांच्या पायाची आग मस्तकात गेली. त्यांनी म्हात्रे यांना मध्येच अडवून त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादात मढवी यांनी आमदार संदीप नाईक यांचे नाव घेतल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली. सभागृहाचे सदस्य नसलेल्या आमदारांचे नाव घेण्याचे काय कारण असा प्रश्न उपस्थित करून मढवी यांनी माफी मागावी अथवा आपले शब्द मागे घ्यावेत यावर सत्ताधारी पक्ष ठाम राहिला आणि या वादात सभागृहाचे दोन तास वाया गेले. यापूर्वी अशा प्रकारचा गोंधळ आणि मानपान-नाटय़ पालिकेच्या २० वर्षीय कारकीर्दीत कधीही झाला नव्हते. त्यानंतर महापौर सुधाकर सोनावणे यांनी मढवी यांना दोन वेळा समज देऊन कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले.धरण, रस्ते, पाणीपुरवठा, डंपिग ग्राऊन्ड, वंडर पार्क, मुख्यालय, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, उड्डाणपूल, सुपर स्पेशालिटी रुग्णालय होऊ नयेत अशी नवी मुंबईकरांची इच्छा असण्याचे कारण नाही, पण या सर्व प्रकल्पांवर करण्यात आलेला खर्च खरोखरच योग्य आहे का याची चौकशी होणे आवश्यक आहे.बाळगंगा धरणाचा खर्च वाढवून अशाच प्रकारे लूट करण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. वाशी येथील पालिका रुग्णालयाचा अर्धा भाग फोर्टिजसारख्या रुग्णालयाला देण्यात आला आहे. या ठिकाणी दहा टक्क्यांत होणाऱ्या उपचाराचा ऊहापोह नगरसेविका अर्पणा गवते यांनी केला. तेव्हा सदस्यांनी बाके वाजवून त्याचे स्वागत केले पण हे दहा टक्के रुग्णालय सुरू झाल्यानंतर किती वर्षांने देण्यात येत आहे आहे याची चौकशी गवते यांनी केलेली नाही.ठाणे-बेलापूर मार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी केवळ पालिकेने खर्च केला नाही. त्यासाठी केंद्राच्या असाईड संस्थेने पालिकेला आर्थिक मदत केली आहे. या प्रकल्पावर अवास्तव झालेला खर्च पालिकेने केला आहे, या बाबीची माहिती सभापती नेत्रा शिर्के यांनी घेतलेली नाही. एका प्रभागात पाच आणि दहा कोटी रुपये खर्च करणे हा कोणता विकास हे सत्ताधारी पक्षातील एकाही नगरसेवकाने स्पष्ट केले नाही. त्यामुळे ही सर्वसाधारण सभा केवळ झालेल्या चुकावंर पांघरून घालण्यासाठी बोलविण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

 पुरस्कारांबाबत संशय
नवी मुंबई पालिकेने किती चांगली कामे केली आहेत आणि त्यामुळे पालिकेला राज्य आणि केंद्र पातळीवर कसे पुरस्कार मिळत असल्याचा डंका सत्ताधारी नगरसेवकांनी पिटण्यास सुरुवात केली. नवी मुंबई पालिकेला मिळालेल्या पुरस्कारात सिडकोचा सिंहाचा वाटा असताना येथील एकही नगरसेवक सिडकोच्या योगदानाचा साधा उल्लेख करीत नव्हता. नवी मुंबईत दोन नवी मुंबई निर्माण झाल्या असून गावात नवी मुंबई शहर नसल्याचा उल्लेख दस्तुरखुद्द सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांनी अनेक वेळा केला आहे.पालिकेला मिळालेल्या पुरस्कारांची त्यांनी अनेक वेळा खिल्ली उडवून आपण समाधानी नसल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे पालिकेला मिळालेल्या राज्य व केंद्र पातळीवरील पुरस्कारांचीही चौकशी करण्याची वेळ आता आली आहे. अधोगतीच्या दिशेने प्रवास सुरू असणाऱ्या नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमाला दोन पुरस्कार मिळतात तेव्हाच या पुरस्कारामध्ये काही काळंबेरं दडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

राज्यातील २६ पालिकांमध्ये नवी मुंबई हे एकमेव असे शहर आहे जे सुनियोजित आहे. त्यामुळे वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीप्रमाणे ते इतर शहरांपेक्षा निश्चितच चांगले आहे, पण याच शहराच्या कुशीत असणाऱ्या गाव व झोपडपट्टी भागातील सुविधा पाहिल्यानंतर या शहराला पुरस्कार कसे मिळतात हा प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही. वरकरणी हे शहर चांगले दिसत असले तरी तुभ्र्यासारख्या झोपडपट्टी भागात व गावात पहाटे उघडय़ावर शौचास बसणाऱ्यांची संख्या शेकडोने आहे, पण या शहरात उघडय़ावर बसणाऱ्यांची संख्या नाही. यासाठी केंद्र सरकारने नुकताच स्वच्छ शहराचा पुरस्कार दिला आहे याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.