वैजापूर व कन्नड तालुक्यांतील काही ठिकाणी २० तासांहून अधिक भारनियमन होत आहे. अधिकारी व कर्मचारी लाच घेतल्याशिवाय कामच करीत नाहीत, असा आरोप करतानाच दुष्काळी भागातील वीज तोडल्यास ग्राहकांच्या संतापाला सामोरे जावे लागेल, असा इशारा खासदार चंद्रकांत खैरे यांनी सोमवारी दिला.
जिल्ह्य़ात प्रभावी विद्युतीकरण व्हावे, या साठी खासदार खैरे यांच्या उपस्थितीत जिल्हा विद्युतीकरणाची बैठक घेण्यात आली. वीज ग्राहकांनी भ्रष्ट कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नावानिशी तक्रारी केल्या. योजना जनतेपर्यंत पोहोचत नसल्याने खैरे व आमदार प्रशांत बंब यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. आलेल्या सर्व अपहारांच्या प्रकरणाच्या तक्रारी लाचलुचपत विभागाकडे सुपूर्द कराव्यात अशा सूचना खासदार खैरे यांनी मुख्य अभियंता शंकर शिंदे यांना केली.
महावितरणने औरंगाबाद महापालिकेला २९ कोटी देणे बाकी आहे. ही रक्कम एकरकमी मिळावी यासाठी स्वत: लक्ष घालणार असल्याचे खैरे यांनी सांगितले. शहराची वाटचाल सोलर सिटी अशी होत असल्याने या प्रकल्पात जीटीएल आणि महावितरणची भूमिका महत्त्वाची असणार आहे. दुष्काळग्रस्त भागातील एकही वीज जोडणी तोडता येणार नाही. तसे केल्यास महावितरण सर्व परिणामांना जबाबदार राहील, असेही खैरे म्हणाले. बैठकीस अधीक्षक अभियंता सुभाष ठाकरे, चंद्रकिशोर हुमणे, साहेबराव मोरे आदी अधिकारी उपस्थित होते.