जिल्ह्य़ात ९ वर्षांनंतर उद्या (शनिवारी) वन्यप्राण्यांची गणना होणार आहे. १२ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके या साठी तयार करण्यात आली आहेत.
मराठवाडय़ात औरंगाबादनंतर सर्वाधिक वनपरिक्षेत्र नांदेड जिल्ह्य़ात आहे. जिल्ह्य़ातल्या माहूर, किनवट, भोकर भागात मोठय़ा प्रमाणात वनक्षेत्र असल्याने तेथे प्राण्यांचे वास्तव्यही बऱ्यापैकी आहे. जिल्ह्य़ात सद्यस्थितीत १२ टक्के वनक्षेत्र उरले आहे. तीन तालुके वगळता कुठे विरळ तर कुठे घनदाट जंगल आहे. या जंगलात बिबटे, अस्वल, तडस, रानडुक्कर, हरिण, चितळ, लांडगा, चिंकारा, रानकुत्रे, लंगूर, कोल्हे, मसण्याउद यांसारखे प्राणी वास्तव्यास आहेत. २००५पूर्वी दरवर्षी वन्यप्राण्यांची गणना होत होती. पण २००५पासून राज्य सरकारच्या आदेशानुसार त्यात खंड पडला.
वन्यप्राण्यांची गणना करण्याबाबत सरकारने कुठलेही सुधारित आदेश नसताना नांदेड वन विभागाचे उपवनसंरक्षक जी. पी. गरड यांच्या पुढाकाराने यंदा वन्यप्राण्यांची गणना करण्याचा निर्णय घेण्यात आला. वन्यपशूंची गणना प्रामुख्याने उन्हाळ्यात तेही पौर्णिमेच्या स्वच्छ चंद्र प्रकाशात केली जाते. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे स्रोत कमी असल्याने पाणवठे आहेत तेथेच वन्यप्राणी आपली तहान भागवतात आणि याच ठिकाणी ही गणना केली जाते. पाणवठय़ाजवळ उंच मचान बांधून वन्यप्राण्यांची गणना करण्याची पद्धत आहे. पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांची दुपारी १२ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी बारापर्यंत गणना केली जाते. जे प्राणी पाणी पिण्यास येतात, त्यांच्या पायाच्या ठशावरूनही मोजणी होते. पायाच्या ठशावरून केवळ बिबटय़ा व तडस या दोनच प्राण्यांची गणना केली जाते.
नांदेड जिल्ह्य़ात १२ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली नैसर्गिक पाणवठे, लहान-मोठे तलाव, नदी, बारमही नाले यावरही प्रगणना होणार आहे. सहायक वनसंरक्षक एस. एम. पोतुलवार, सी. एस. जॉर्ज, सी. एम. सुंभ यांच्या मार्गदर्शनाखाली ही गणना होणार असून, वन्यप्राण्यांची गणना योग्य पद्धतीने व अचूक होण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याची माहिती नांदेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक शंकरवार यांनी दिली.
बिबटय़ांची संख्या सातत्याने घटत चालल्याचे वनविभागाच्या नोंदीवरून स्पष्ट होते. दुर्मिळ असलेल्या वन्यपक्षी, प्रजातींपैकी सर्पगरुड नांदेडमध्ये आढळला, पण तुरेवाला गरुड मात्र नाही. चिंकारा, हरिण, घोरपड आढळल्याची नोंद वनविभागाकडे नसली, तरी आठवडी बाजारात सर्रास त्याची विक्री होते. जिल्ह्य़ातील वनपरिक्षेत्र कमी होत चालले असताना प्राण्यांचे वास्तव्य वाढणार की कमी होणार, हे या गणनेनंतर स्पष्ट होणार आहे.

२२ प्रकारचे वन्यजीव
२००५च्या वन्यप्राणी गणनेनुसार जिल्ह्य़ात बिबटय़ा (पँथर १५), अस्वल २४, भेकड ३६, रानमांजर ६२, कोल्हा १९०, लांडगा ५८, चिंकारा १, काळवीट २७, सर्पगरुड ६, नीलगाय ४१६, चितळ ३, वानर ११४५, लंगूर ८९, जंगली डुक्कर १५०, तरस ३, रानमांजर ६२, सायाळ ३, जंगली ससा ६३, मसण्याउद ४, मुंगूस ३, मोर ६५४ व रानकोंबडी ६ असे २२ प्रकारचे वन्यजीव आढळल्याची नोंद आहे. नांदेडच्या जंगलात बिबटय़ाचा वावर असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. वनविभागाच्या नोंदीनुसार २००१नंतर कोणताही वाघ नसल्याचे स्पष्ट होते.