देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज म्हणून लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेला नवी मुंबई पालिका मुख्यालयासमोर फडकणारा राष्ट्रध्वज सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे शिलाई उसवून दररोज फाटत असल्याने आता केवळ सकाळी साडेसात ते रात्री आठ वाजेपर्यंत फडकणार असल्याचे पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. दरम्यान दररोज फाटणारा हा राष्ट्रध्वज पॅराशूट कापडाचा बनविता येईल का याची चाचपणी राज्य खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या वतीने केली जाणार आहे. सध्या सहा राष्ट्रध्वज पालिकेकडे असून, आणखी सहा आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनामधील दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे समजते.
नवी मुंबई पालिका प्रशासनाने बेलापूर येथे बांधलेले मुख्यालय देशात सर्वोत्तम शासकीय इमारत आहे, असे सांगण्याचा प्रयत्न पालिकेचे उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर, शहर अभियंता मोहन डगांवकर, सह शहर अभियंता जी. व्ही. राव यांनी केला. मध्यवर्ती वातानुकूल यंत्रणा असल्याने आग लागल्यास ती बंद करणे सोपे जात असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले असून, नवी मुंबई पालिकेच्या मुख्यालय निर्मितीनंतर राज्यात अशा प्रकारे इमारती बांधण्याचे शासनाने ठरविले असल्याचे सांगण्यात आले. नवी मुंबईचा मानबिंदू ठरलेला देशातील सर्वात उंच (२२५ फूट) राष्ट्रध्वज हा प्रतीक चिन्ह असल्याने त्याची वेगळी आचारसंहिता असल्याचे सिन्नरकर यांनी स्पष्ट केले. पामबीच मार्गावरील सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे हा राष्ट्रध्वज दररोज शिलाई उसवल्याने फाटत असल्याची बाब अधोरेखित करण्यात आली. त्यामुळे हा ध्वज आता दिवसा लावण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. कारगील, हरयाणा येथे असे ध्वज असून ते अशाप्रकारे नैर्सगिक स्थितीत दोन-चार दिवस काढून ठेवले जात असल्याचे सिन्नरकर यांनी स्पष्ट केले. ७० किलो असणारा हा ध्वज सॅटिन कापडाचा असल्याने दररोज फाटत आहे. त्याऐवजी आता पूर्णपणे कॉटनचा हा ध्वज बनविण्याची जबाबदारी खादी ग्रामोद्योगने घेतली असून, ते पॅराशूटचा ध्वज बनविण्याचा प्रयत्न करणार आहेत. ध्वज बनविण्याची देशात एकाच कंपनीची मक्तेदारी असल्याने त्यांना ऑडर दिल्यानंतर एक महिन्याने ध्वज मिळत आहेत. त्यामुळे फाटलेल्या ध्वजाला पर्याय म्हणून दुसरा ध्वज तयार असावा यासाठी सहा ध्वज पालिकेकडे आहेत. यापेक्षा आणखी सहा आणून ठेवले जाणार आहेत. एका ध्वजाची किंमत ४५ हजार रुपये आहे.