शहरातील खुटवडनगर भागात गुरुवारी सकाळी एक दाम्पत्य गंभीररीत्या जखमी झाल्याचे उघड झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गंभीर जखमी झालेल्या दांपत्याने दिलेल्या जबानीवरून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली. आर्थिक देवाण-घेवाणीच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचा अंदाज असून पोलीस त्या अनुषंगाने तपास करत आहेत. दरम्यान, गंभीर जखमी दाम्पत्याने ओळखीच्या व्यक्तीने हल्ला केल्याचा जबाब दिला असला तरी त्यांनी ज्यांचे नाव घेतले, त्याला लाखो रुपये घेणे असल्याचे संबंधिताने म्हटले आहे.
खुटवडनगरच्या वावरेनगर लगतच्या प्रणव रेसिन्डेन्सीमध्ये ही घटना घडली. मूळचे पुण्याचे परंतु काही वर्षांपासून नाशिकमध्ये वास्तव्यास असलेले दीपक पटवारी आणि त्यांची पत्नी मानसी हे दोघे राहत्या घरात गंभीर जखमी अवस्थेत आढळले. घरात रक्ताचा अक्षरश: सडा पडला होता. उभयतांच्या हातावरील नसा कापल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती समजल्यावर भाजपचे पदाधिकारी प्रदीप पेशकार व स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावत जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी पोलीस यंत्रणेला जखमी दाम्पत्याने मुकुंद बंगनामक व्यक्तीने हल्ला चढविल्याचे सांगितले. दरम्यानच्या काळात बंग यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पुणे येथे दीपक पटवारी यांच्यासमवेत आपला भागीदारीत व्यवसाय होता. दोन वर्षांपूर्वी जवळपास ३५ लाख रुपये देण्याचे टाळून पटवारी गायब झाले. तेव्हापासून आपण त्यांचा शोध घेत होतो. दोन दिवसांपूर्वी त्यांचे घर सापडल्यानंतर पैशांच्या देवाणघेवाणीवरून चर्चा सुरू असल्याचे संबंधिताने पोलीस यंत्रणेला सांगितले. परस्परविरोधी बाबी समोर येत असल्याने पोलीस यंत्रणा बुचकळ्यात सापडली.
आर्थिक वादावरून ही घटना घडल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. अंबडचे पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी त्यास दुजोरा दिला. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमी दाम्पत्य सल्लागाराचे काम करत असल्याचे सांगितले जाते. महात्मानगर येथे त्यांचे कार्यालय आहे. काहींना संबंधितांनी चार्टर्ड अकौंटंट असल्याचे सांगितले होते. काहींना संबंधिताचे त्या अनुषंगाने केवळ अर्धवट शिक्षण झाल्याचे ज्ञात आहे. पोलीस यंत्रणा ही घटना आत्महत्येचा प्रयत्न आहे की हल्ल्याचा प्रकार याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहे. सायंकाळी उशिरापर्यंत वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला नाही. यामुळे जखमींच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.