पक्षकारांना आपल्या परिसरातच न्याय मिळावा या हेतूने राज्य विधिसेवा प्राधिकरणाच्या वतीने ठाणे जिल्ह्य़ात ७ ते ३१ जानेवारी दरम्यान ‘न्यायालय आपल्या दारीह्ण उपक्रम राबविला जात आहे.
या फिरत्या न्यायालयात जिल्ह्य़ाच्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनतेची प्रलंबीत प्रकरणे, मोटार अपघात दावे, दिवाणी स्वरूपाची प्रकरणे तसेच कायद्याने मिटविता येण्याजोगी फौजदारी प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत. गरजूंनी प्राधिकरणाकडे अर्ज केल्यास मोबाइल न्यायालय थेट त्यांच्या दारापाशी येऊन न्याय देणार असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस.एम. चंदगडे यांनी सांगितले. ‘न्यायालय आपल्या दारीह्ण हा उपक्रम तीन वर्षांपूर्वी राज्यात प्रथम ठाणे जिल्ह्य़ातील मुंब्रा येथे राबविण्यात आला. त्यावेळी ३० हून अधिक मोटार दाव्यांची प्रकरणे निकाली निघून पक्षकारांना ३० लाखांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई मिळाली होती.