वेश्याव्यवसायासाठी नगर शहरातून अपहरण झालेल्या, अत्याचारित अल्पवयीन मुलीचा ताबा मिळावा यासाठी तिच्या वडिलांनी (उत्तर प्रदेश) दाखल केलेला अर्ज येथील विशेष न्यायालयाने फेटाळत, मुलीस पुन्हा औरंगाबादच्या महिला सुधारगृहात ठेवण्याचा आदेश गुरुवारी दिला.
विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश यू. बी. देबडवार यांनी हा आदेश दिला. सरकारतर्फे सरकारी वकील सुरेश लगड व रमेश जगताप यांनी काम पाहिले. नगर शहरातील ही घटना राज्यभरात गाजली होती व त्यासंदर्भात अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड व तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवलनाथ तांबे यांना निलंबित करण्यात आले.
जानेवारीमध्ये सावेडीतील बिग बाजार इमारतीसमोर घडलेल्या या घटनेत शिरपूर (धुळे) येथे कुंटणखाना चालवणारे, मुलीची खरेदी व विक्री करणारे, मुलीचा मित्र अशा एकूण १० जणांविरुद्ध तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यातील ८ जणांना अटक केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत, दोघे अजूनही फरार आहेत. पोलीस निरीक्षक विजयसिंह पवार यांनी या घटनेचा तपास केला. न्यायालयाच्याच आदेशाने संबंधित मुलीला औरंगाबादच्या सुधारगृहात ठेवण्यात आले होते. तिचे वय १५ वर्षे व ६ महिने आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशात राहणा-या तिच्या वडिलांनी येथील न्यायालयात अर्ज करून मुलीचा ताबा मिळावा, अशी मागणी केली होती. आपण तिचा चांगल्या पद्धतीने सांभाळ करू, योग्य संस्कार करू असे त्यांनी अर्जात नमूद केले होते. परंतु सरकारी वकील लगड यांनी त्यास जोरदार विरोध करत मुलीच्या पुणे येथे राहणा-या आईने कोरेगाव पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध दिलेल्या फिर्यादीकडे लक्ष वेधले. मुलीच्या वडिलांना गेल्या दहा वर्षांपासून दारू पिऊन मारहाण करण्याची सवय असल्याचे तसेच त्यांची आपल्या दोन्ही मुलींकडे वाईट नजर असल्याचे त्यात म्हटले आहे व वडिलांपासून संरक्षणाची मागणीही केल्याकडे लक्ष वेधण्यात आले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्या अल्पवयीन मुलीचा ताबा मागणारा वडिलांचा अर्ज फेटाळला.