अशोक लांडे खून प्रकरणातून आपल्याविरुद्धची कलम १२० ब व कलम २०१ ही कलमे वगळावीत या मागणीचा भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी दाखल केलेला अर्ज शनिवारी न्यायालयाने फेटाळला.
दरम्यान माजी महापौर संदिप कोतकर याने महापालिका निवडणुकीमुळे जिल्ह्य़ात प्रवेश करण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावरील सुनावणी तसेच आरोपी सचिन सातपुते याने गुन्ह्य़ातून वगळावे, यासाठी दाखल केलेल्या अर्जावरील निर्णय २७ सप्टेंबर रोजी होणार आहे.
अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश बी. यू. देबडवार यांनी हा आदेश शनिवारी दिला. आ. कर्डिले यांचा कलमे वगळण्याचा अर्ज दुसऱ्यांदा फेटाळण्यात आला आहे. यापुर्वी ३ ऑगस्टला फेटाळला गेला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे दाद मागितली होती, तेथेही त्यांनी तो मागे घेतला होता. नंतर पुन्हा येथील जिल्हा न्यायालयात दाखल केला होता. या अर्जावर कर्डिले यांच्या वतीने पुर्वी वकिल हर्षद निंबाळकर यांनी युक्तीवाद केला होता. शनिवारी सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकिल सतीश पाटील यांनी युक्तीवाद केला. दोन्ही बाजू ऐकल्यावर न्यायालयाने हा अर्ज फेटाळला.
माजी महापौर संदिप कोतकरने नगरच्या महापालिका निवडणुकीमुळे आपल्याला जिल्ह्य़ात प्रवेश करण्याची परवानगी द्यावी, अशा मागणीचा अर्ज दाखल केला होता. त्यावरील सुनावणी दि. २७ रोजी ठेवण्यात आली आहे. यामध्ये फिर्यादी शंकरराव राऊत यांनी मूळ खटल्याच्या सुनावणीत अडथळे आणण्यासाठी आरोपी वेगवेगळे अर्ज करत असल्याकडे लक्ष वेधणारा अर्ज सादर केला. आरोपी सचिन सातपुते याने गुन्ह्य़ातून वगळण्यासाठी पुर्वीच अर्ज केला आहे. जिल्हा सरकारी वकिल पाटील व आरोपीच्या वतीने वकिल प्रसन्न जोशी यांचा युक्तीवाद पुर्ण झाला. त्यावर दि. २७ रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे.
पोलिसांचाच आता नवा अर्ज
लांडे खून प्रकरणात दोषारोप निश्चिती लांबल्याने आज तपासी अधिकारी, पोलीस अधीक्षक शाम घुगे यांनी जिल्हा सरकारी वकिल पाटील यांच्यामार्फत सत्र न्यायालयात एक अर्ज दाखल केला. आरोपी न्यायालयात वारंवार गैरहजर राहतात, वेगवेगळे अर्ज सतत दाखल करतात, त्यामुळे पोलीस व न्यायालय यांचा वेळ खर्च होतो, त्यामुळे आरोपींना न्यायालयानी कोठडीत घेऊन दोषारोप निश्चित केले जावेत, असे अर्जात नमूद करण्यात आले आहे.