छोटा राजन टोळीतील गुंड लखनभैय्या याच्या बनावट चकमकीप्रकरणी आधीच तुरुंगात असलेले माजी ‘चकमकफेम’ पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा हे आणखीन अडचणीत आले आहेत. १५ वर्षांपूर्वीच्या खंडणीप्रकरणी न्यायालयाने त्यांना समन्स बजावत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लखनभैय्या बनावट चकमक खटल्याच्या निकालाच्या प्रतिक्षेत असलेल्या शर्मा यांना नव्या खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.
या खंडणीप्रकरणी आणखी एक ‘चकमकफेम’ अधिकारी दया नायक हेही आरोपी आहेत. बऱ्याच वर्षांच्या निलंबनानंतर काही महिन्यांपूर्वीच नायक सेवेत रुजू झाले होते. कालिना येथील भंगार व्यावसायिक तारिक अहमद यांना शर्मा, नायक यांच्यासह अन्य पाच आरोपींनी खंडणीसाठी धमकावले होते. १९ मार्च १९९७ रोजी आरोपींनी अहमद यांची गाडी अडवून त्याच्याकडून पाच लाख रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम नंतर दोन लाख रुपयांवर निश्चित होऊन दुसऱ्याच दिवशी आपणी ती आरोपींकडे दिल्याचा आरोप अहमद यांनी केला आहे. आरोपी एवढय़ावरच थांबले नाहीत.  नायक यांनी १५ दिवसांनी आपल्याला परत बोलावले आणि आणखी रक्कम देण्यास धमकावले. अहमद यांनी याप्रकरणी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आयोगाने पोलीस आयुक्तांना प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. गुन्हे अन्वेषण विभागाने १९९९ मध्ये नायक याच्यासह अन्य तीन आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर २००८ मध्ये अहमद यांनी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे धाव घेत शर्मा यांनाही आरोपी करण्याची मागणी केली होती. महानगरदंडाधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळून लावली. परंतु सत्र न्यायालयाने २०१० मध्ये शर्मा यांना खटल्यात आरोप करण्याचे आदेश दिले. त्याच्यानंतर पहिल्यांदाच या प्रकरणी २७ एप्रिल रोजी सुनावणी होणार असून न्यायालयाने शर्मा यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.