संपूर्ण राज्यात गाजलेल्या माढा तालुक्यातील बेंदवस्ती येथील पारधी हत्याकांडप्रकरणी सोलापूरच्या सत्र न्यायालयाने दोघा मायलेकीसह सहा आरोपींना गुरुवारी दोषी धरले. तर एका आरोपीला सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले. दोषी धरलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा का सुनावण्यात येऊ नये अशी विचारणा करीत न्यायालयाने अंतिम शिक्षेबद्दल उद्या शुक्रवारी सुनावणी निश्चित केली आहे.
या पारधी हत्याकांडात दोन महिलांसह सहा मुले अशा आठजणांचा जाळून निर्घृणपणे खून करण्यात आला होता. केवळ गाव सोडून जात नाही म्हणून हे हत्याकांड करण्यात आले होते. या खटल्यात झुंबरबाई भैरू काळे (वय ५०) तिची मुलगी चांदणी लाल्या पवार (वय २७), जब्बार भानू शिंदे (वय ४६), नेताजी भैरू काळे (वय ३०), बटऱ्या बागवान्या काळे (वय ५५) व शिवाजी अल्फ्या पवार (वय ३५) अशी दोषी धरण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील बटऱ्या पवार हा सध्या फरारी आहे. यापूर्वी अटकेत असताना त्याने या गुन्हय़ाबद्दलचा जबाब नोंदवला होता. तर अज्या अल्फ्या पवार (वय ३४) हा खटल्यात जामिनावर सुटल्यानंतर अद्याप न्यायालयात हजर झाला नव्हता. त्यामुळे त्यास फरारी घोषित करण्यात आले आहे. तसेच लाल्या बालूशा पवार (वय ४०) हादेखील सुरुवातीपासून फरारी आहे. त्यामुळे लाल्या व अज्या पवार या दोघा फरारी आरोपींविरुद्ध स्वतंत्र खटला चालविण्यात येणार आहे. यातील नववा आरोपी बंटय़ा काळे याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. हे सर्व आरोपी माढा व कुडरूवाडीतील राहणारे आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश शब्बीर अहमद औटी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली.
या खटल्याची पाश्र्वभूमी अशी, की सुरेश छाटन पवार (वय ५५) हा आपल्या कुटुंबीयांसह माढा तालुक्यातील बेंदवस्ती येथे राहात होता. त्याच्याबरोबर भाऊ अशोक छाटन पवार व त्याचे कुटुंबीयही राहात होते. दि. १४ फेब्रुवारी २०१० रोजी दुपारी तीनच्या सुमारास सुरेश पवार हा आपल्या भावासह उंदरगाव (ता. माढा) येथे काही कामानिमित्त गेला होता. त्याच रात्री बाराच्या सुमारास आपली झोपडी जळाल्याची माहिती त्यास समजली. तेव्हा तातडीने बेंदवस्तीकडे धाव घेतली असता त्याच्या झोपडी जळून खाक झाल्याचे व त्यात कुटुंबीयांतील आठजणांचा पूर्णत: जळून भस्मसात झाल्याचे भयावह दृश्य दिसले. या भीषण घटनेचा प्रत्यक्ष नेत्र साक्षीदार पवार याचा मामा अभिमान काशिनाथ काळे (वय ६५, रा. मुंगशी लोणी, ता. माढा) हा होता. तो दहा दिवसांपूर्वी आपल्या भाच्याकडे राहण्यास आला होता. घरात रात्री झोपण्यासाठी जागा नसल्यामुळे तो घराबाहेर काही अंतरावर झोपला होता. त्या वेळी मध्यरात्रीच्या सुमारास सुरेश पवार याच्या झोपडीतून लहान मुलांच्या ओरडण्याचा आवाज आला. तेव्हा अभिमान काळे झोपेतून जागा होऊन झोपडीकडे धावत गेला असता झोपडीला आग लागल्याचे दिसून आले. तेव्हा हा गोंधळ ऐकून शेजारचे शांतिनाथ पाटील हे देखील झोपेतून जागे झाले व घटनास्थळी धावत आले. परंतु तोपर्यंत पेटलेल्या झोपडीतील लहान मुलांचा व महिलांचा आवाज बंद झाला होता. तर त्याचवेळी आगीच्या उजेडात झुंबरबाई भैरू काळे ही एकटीच जवळच्या रेल्वे रुळाच्या दिशेने गेलेली दिसली. त्यानंतर अभिमान काळे हा झोपडीजवळ आरडोओरड करीत थांबला. थोडय़ा वेळाने झोपडी संपूर्णत: जळून खाक झाली व त्यातील सर्व महिला व मुले जागीच भाजून भस्मसात झाली होती. हे जळीतकांड झुंबरबाई काळे हिच्यासह इतर आरोपींनी केले होते. झुंबरबाई व सुरेश पवार यांच्यात बऱ्याच दिवसांपासून वैमनस्य होते. झुंबरबाई ही पवार कुटंबीयांना गाव सोडून जाण्याबद्दल वारंवार बजावत होते. गाव न सोडल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशाराही देत होते. त्यातूनच हे जळीतकांड घडल्याचे आढळून आले.
या जळीतकांडात सुरेश पवार यांची सावत्र सून मनीषा (वय २६) व नीताबाई (वय १८) यांच्यासह नातू मंगेश (वय ६), स्वाती (वय ३), महेश (वय सहा महिने) तसेच मुलगा राघू (वय ११), मुलगी छकुली (वय ९) व भावाचा मुलगा पिराजित (वय ८) यांचा हकनाक आगीत होरपळून मृत्यू झाला. यातील मृत नीताबाई हिचा विवाह घटनेच्या अगोदर केवळ पंधरा दिवसांपूर्वीच झाला होता. तर मृत मनीषा व तिची दोन मुले व एक मुलगी असे चौघे या पारधी हत्याकांडात बळी गेले. मनीषा हिचा पती संजय काँग्रेस पवार हा घटनेच्या वेळी गावात नव्हता. त्यामुळे तो बजावला. परंतु त्याचे संपूर्ण कुटुंबीय मृत्युमुखी पडल्यामुळे संजय हा एकटाच आयुष्य कंठत आहे.  
या पारधी हत्याकांडामुळे केवळ सोलापूर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्य हादरले होते. विशेषत: हा भाग केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या माढा लोकसभा मतदारसंघातील असल्यामुळे या घटनेची माहिती समजल्यानंतर शरद पवार यांना बेंदवस्ती येथे घटनास्थळी भेट द्यावी लागली होती.
या गुन्हय़ाप्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यातील लाल्या पवार हा सुरुवातीपासून फरारी आहे. तर खटला सुरू असताना आरोपी बटऱ्या पवार व अल्फ्या पवार हे दोघे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जामिनावर सुटले होते. परंतु नंतर ते हजर न होता फरारी झाले. न्यायालयाने त्यांच्या जामीनदारांना नोटीस बजावली असता जामीनदारांनी प्रत्येकी पन्नास हजारांची रक्कम भरली. त्यानंतर फरारी आरोपींची मालमत्ता जप्त करण्याबाबत प्रक्रिया सुरू झाली. जामिनावर सुटलेले दोघे आरोपी हजर न झाल्यामुळे खटल्याच्या सुनावणीस विलंब झाला. तसेच निकालासही उशीर झाला.
या खटल्यात सरकारतर्फे अ‍ॅड. इनायतअली शेख यांनी नऊ साक्षीदार तपासले. यात नेत्र साक्षीदार अभिमान काळे व फिर्यादी सुरेश पवार यांची साक्ष महत्त्वाची ठरली. तर या जळीतकांडासाठी पेट्रोलचा वापर झाला होता. आरोपीना अटक करून त्यांचे वापरते कपडे जप्त करून रायायनिक पृथक्करणासाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल सकारात्मक आला. आरोपींच्या कपडय़ावर पेट्रोलचे द्रव्य असल्याचा अभिप्राय रासायनिक पृथक्करणाद्वारे देण्यात आला. त्यामुळे हा पुरावा महत्त्वाचा ठरला. सरकारी वकील इनायतअली शेख यांचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला. मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. विजय पाटील (बार्शीकर) व अ‍ॅड. एस. आय. खादीम यांनी काम पाहिले. तर आरोपींकडून अ‍ॅड. मिलिंद थोबडे, अ‍ॅड. राजेंद्र बायस, अ‍ॅड. काझी व अ‍ॅड. लोंढे-पाटील यांनी बाजू मांडली.
गुरुवारी न्यायालयाने सात आरोपी झाल्यानंतर त्यापैकी सहाजणांना न्यायालयाने दोषी धरले. या वेळी सरकारी वकील शेख यांनी दोषी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयाने आरोपींना फाशीच्या शिक्षेबद्दल विचारणा केली. तेव्हा दोषी आरोपींनी दयेची विनंती केली. परंतु सरकारी वकील शेख यांनी गुन्हय़ाचे गांभीर्य पाहता आरोपींना दया दाखविणे अयोग्य ठरणार असल्याचे म्हणणे मांडले. न्यायालयाने आरोपींच्या शिक्षेबद्दल उद्या शुक्रवारी सुनावणी ठेवली आहे.