एप्रिल आणि मे महिन्यात दरवर्षी निर्माण होणारी दुष्काळजन्य स्थिती, सातत्याने जाणवणारी पाणीटंचाई, चाऱ्याचे वाढलेले भाव, जनावरे विकण्याचे वाढलेले प्रमाण, शासनाच्या विविध योजना गावपातळीवर न पोहोचणे या व इतरही अनेक कारणांमुळे जनावरांच्या संख्येत मोठी घट झाली असून एकेकाळी मोठय़ा संख्येने दिसणारे पाळीव जनावरांचे गोठे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी जनावरे सांभाळणाऱ्या गुराख्यांवरही बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
पूर्वी ग्रामीण भागात गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढय़ा इतर पाळीव प्राण्यांची संख्या मोठी होती. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी जनावरे पाळायचे. चाकरमानी मंडळीही हौसेखातर गाय-म्हैस पाळायचे. बेरोजगारीवर मात करीत अनेकांनी सुरू केलेला पशुपालन व दुग्धव्यवसाय भरभराटीला आला होता. गुरे चारण्यासाठी गुराख्यांकडे येणाऱ्या जनावरांची संख्या दीडशे-दोनशेच्या जवळपास असायची. ते जनावरांचे  कळप गावात सकाळ-संध्याकाळी हमखास नजरेस पडायचे. या व्यवसायातून गुराख्यांना मोठा रोजगार मिळायचा. आजच्यासारखी पाणी, चारा टंचाई तेव्हा नव्हती. हिरवा चारा मुबलक प्रमाणात मिळायचा. चाऱ्याचे, पेंडीचे भाव सामान्य शेतकऱ्यांना परवडणारे होते. पाच-दहा रुपयांत हिरव्यागार लुसलुशीत गवताचा भारा मिळायचा. परंतु हे चित्र आता इतिहासजमा झाले आहे. गेल्या काही वर्षांत पर्जन्याचे प्रमाण कमालीचे घटले आहे. चारा व पाणीप्रश्न प्रकर्षांने जाणवू लागला आहे. चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा दुष्काळजन्य स्थितीत जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांसह इतरांनाही आर्थिकदृष्टय़ा परवडेनासे झाले आहे. जनावरांची बेभाव विक्री केली जात आहे.
शहरात जनावरांच्या बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात जनावरे विक्रीला आणली जात आहे. आर्थिक परिस्थितीमुळे काही शेतकरी जनावरे विकत आहे. दोन दिवसांपूर्वी अवैधरित्या घेऊन जाणारा जनावरांचा ट्रक नागपुरात पकडण्यात आला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांमुळे सर्व जनावरे वाचली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धुराळ्यात जनावरांच्या चारा-पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले. शेतकरी, पशुपालकासमोर हा प्रश्न ‘आ’वासून उभा आहे. सोयाबीनसारख्या नगदी पिकामुळे ज्वारीच्या लागवडीत घट झाल्यामुळे कडबा पेंडी दहा-बारा रुपयाला एक या प्रमाणे पशुपालकांना विकत घ्यावी लागत आहे. कडब्याचे दर वाढल्यामुळे जनावरांच्या विक्रीत वाढ झाली आहे. दहा वर्षांपूर्वी शेकडा नव्वद-शंभर रुपयांप्रमाणे कडबा सहज मिळायचा. पेरणीच्या तोंडावर शेतकरी शे-दोनशे कडबा पेंडी विकत घेत असे. कडब्याची गंजी सालभर शेतात लावलेली असायची पण नगदी पिकाच्या पद्धतीमुळे ज्वारीखालील क्षेत्र झपाटय़ाने घटले. सोयाबीन, कापूस, कडधान्य, लागवडीकडे वळलेल्या शेतकऱ्यांना कडबा टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाऊस कमी झाल्यामुळे विहीर, बोअर आटले. त्यामुळे शेतात ओलिताचे क्षेत्र कमी झाले. जनावरांसाठी चारा-पाणी समस्या निर्माण झाली. शेकडा हजार बाराशे अशा विक्रमी भावाने ज्वारीचा कडबा विकला जात आहे. त्यासाठी गावोगावी फिरण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे. एकेकाळी साठ रुपये शंभर याप्रमाणे कडबा कोणी विकत घेत नसे. आज याच कडब्याचे दर गगनाला भिडले आहेत. नियोजनाचा अभाव असलेल्या शेतकऱ्यांनी ज्वारीचे क्षेत्र घटविले; त्यामुळे चारा टंचाई उद्भवली. परिणामी पशुपालक पशुधनाची विक्री करत आहे. यामुळे गुराख्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.