केंद्र व राज्यातील सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असून या मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देऊन चौकशीला सामारे जावे, अशी मागणी करीत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने मंगळवारी उरणमधील गांधी चौकात निदर्शने केली.  काँग्रेस व भाजपमध्ये कोणताच फरक नसल्याने जनतेची फसवणूक झाली आहे. या विरोधात माकप देशभरात ऑगस्ट महिन्यात सरकारविरोधी जनजागरण करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
काँग्रेसच्या भ्रष्टाचारी राजवटीला कंटाळलेल्या जनतेने पर्याय म्हणून स्वच्छ पारदर्श कारभाराच्या आश्वासनावर विश्वास ठेवून भाजपकडे सत्ता दिली. मात्र अवघ्या एका वर्षांतच आश्वासनांचा बोजवारा उडाला असून सरकारमधील मंत्र्यांच्या अनियमिततेची प्रकरणे उघड होऊ लागली आहेत. विरोधी पक्ष असताना काँग्रेसच्या मंत्र्यांच्या राजीनाम्यांची मागणी करणारे भाजपचे मंत्री मात्र राजीनामे देणार नाही, असे सांगू लागले आहेत. त्यामुळे कुठे गेली भाजपची पारदर्शकता, असा सवाल करीत माकपचे रायगड जिल्हा सचिव संजय ठाकूर यांनी या वेळी केंद्र सरकारचा निषेध केला. ऑगस्टमध्ये जनजागरण अभियानात सरकारच्या भ्रष्टाचाराचे पितळ उघडे करणाऱ्या ‘एक साल बेहाल’ या आशयाच्या हजारो पुस्तिकांचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.