News Flash

गोंदिया पालिकेच्या इमारतीला भेगा, करवसुली विभागातही पाणी गळती

येथील नगरपालिकेच्या विविध विभागाच्या इमारतींना भेगा पडल्या आहेत. या भेगांमधून पाणी गळत असून िभती पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, जीव धोक्यात घालून नगर परिषदेचे

| August 6, 2013 08:44 am

येथील नगरपालिकेच्या विविध विभागाच्या इमारतींना भेगा पडल्या आहेत. या भेगांमधून पाणी गळत असून िभती पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, जीव धोक्यात घालून नगर परिषदेचे कर्मचारी काम करीत आहेत. यामुळे येथील रेकॉर्डही खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, इमारतीची डागडुजी करण्याची गरज पालिका प्रशासनाला वाटत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
कोटय़वधीची करवसुली करणारी ही नगर परिषद समस्यांच्या विळख्यात सापडली आहे. पालिकेच्या विविध विभागांच्या इमारतीच्या भिंतींना भेगा पडल्याने त्या पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिकेचा करवसुली विभाग अतिशय महत्वाचा विभाग आहे. करवसुलीसंदर्भात सर्वच रेकॉर्ड या विभागाकडे असतो. परंतु, या विभागाचा कारभार ज्या इमारतीमधून चालतो तिच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत. या भेगा अनेक दिवसांपासून असल्या तरी संबंधितांचे त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाऱ्यांचा जीव मात्र धोक्यात आला आहे. या भेगांमधून मोठय़ा प्रमाणावर पाणी गळत असल्याने व सध्या पावसाळा असल्याने ही गळती दोन महिने राहणार असून पाण्यामुळे रेकार्ड खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय, अशा परिस्थितीत रेकार्डला वाळवीसुद्धा लागण्याची शक्यता आहे.
पालिकेच्या करवसुली विभागाबरोबरच इतर विभागही समस्यांच्या विळख्यात सापडले आहेत. भेगा पडलेल्या इमारतींच्या दुरुस्तीची जबाबदारी पालिकेची आहे. परंतु, पालिकेने ती केलेली नाही. विशेष म्हणजे, पालिकेच्या ज्या इमारतींना भेगा पडल्या तेथील कारभार इतरत्र हलवण्यात येऊ शकतो. परंतु, पालिकेकडे अतिरिक्त इमारती उपलब्ध नाहीत. इमारतींची कमतरता असल्यामुळे रेकार्ड ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पालिकेच्या सव्‍‌र्हेअर विभागात फेरफटका मारला असता या समस्येची प्रचीती आली.
या विभागाची केवळ एकच खोली असून भरमसाट रेकॉर्ड आहे. या विभागात १५ ते २० कर्मचारी आहेत. सव्‍‌र्हेसंबंधीचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी रेकार्ड टेबलावर, टेबलाखाली, खुर्चीमागे असे चारही बाजूला रेकॉर्डचे गठ्ठे ठेवायला सुरुवात केली आहे.  
या विभागातील कर्मचारी ३० वर्षांपासून साडेसहा हजार रुपयांच्या अत्यल्प मानधन तत्वावर काम करीत असून इतर समस्याही त्यांना भेडसावत आहेत. विकासकामांवर कोटय़वधी रुपये खर्च करणारी पालिका या इमारतींचा पर्याय शोधायच्या प्रयत्नात नसल्यामुळेच ही समस्या निर्माण झाली असून कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या केबिन चकाचक आहेत. परंतु, पालिकेचे महत्वाचे रेकार्ड असलेले विभाग दुर्लक्षित आहेत. याकडे मुख्याधिकाऱ्यांसह पालिका प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2013 8:44 am

Web Title: crack to gondiya corporation building
Next Stories
1 खड्डय़ांसमोर बाकडे टाकून मनसेचे आंदोलन
2 मोझरच्या महिलांचा दारूबंदीसाठी मोर्चा
3 पाठय़पुस्तकांचे वाचन करा, व्हीडीओ गेम्स पाहू नका – डॉ. ओक
Just Now!
X