महिलांच्या डब्यात मानवी विष्ठा पसरवणारे विकृत पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी मुंब्रा येथे राहणाऱ्या एका विकृत व्यक्तीला अटक केल्यानंतर हा हिडीस प्रकार थांबेल, अशी महिलांची अपेक्षा मात्र फोलच ठरली आहे. ही विष्ठा दरवाज्यातील दांडा, डब्यातील सीट आणि हँडल्स अशा ठिकाणी पसरल्याने महिलांचा हात त्याला लागतो. महिलांच्या मनावर या घटनेचा खूपच गंभीर परिणाम होऊन दोन-दोन दिवस उलटय़ा होणे, गाडीत चढताना किळस वाटणे असे त्रास महिला प्रवाशांना होत आहेत. रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्था मात्र हे प्रकार रोखण्यात अपयशी ठरत आहे.
मध्य रेल्वेवर बदलापूर, कर्जत आणि कसारा या स्थानकांवरून येणाऱ्या गाडय़ांमध्ये महिलांच्या डब्यात सकाळी सकाळी मानवी विष्ठा पसरून ठेवल्याचे प्रकार गेल्या वर्षभरात अनेकदा घडले होते.
या प्रकारांनंतर महिलांनी संबंधीत गाडय़ा त्या-त्या स्थानकांत थांबवून गाडय़ा साफही करायला लावल्या होत्या. या प्रकारामागे असलेल्या विकृत व्यक्तींचा छडा लावण्यात रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांना सातत्याने अपयश आले होते. मात्र ऑगस्ट महिन्यात मुंब्रा येथे राहणाऱ्या गोविंद भावसरे या व्यक्तीला अटक करत रेल्वेने हे प्रकार थांबल्याची ग्वाही दिली.
मात्र मंगळवारी सकाळी साडेसात-पावणे आठदरम्यान कसाऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या लोकलच्या महिला डब्यात मानवी विष्ठा पसरली असल्याचे महिलांच्या निदर्शनास आले. या महिलांनी त्वरित प्रवासी संघटनेच्या महिला प्रतिनिधी लता अरगडे यांच्याशी संपर्क साधून त्यांना घडल्या प्रकाराची माहिती दिली.
कल्याण स्थानकात ही गाडी थांबवण्यात आली, तरी रेल्वेचे वेळापत्रक सांभाळण्यासाठी ही गाडी साफ न करता मुंबईकडे रवाना करण्यात आल्याचे अरगडे यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले.
तर आंदोलनाचा पर्याय
ऑगस्ट महिन्यात एका विकृत व्यक्तीला अटक झाल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर दोनच दिवसांनी पुन्हा महिलांच्या डब्यात अशी विष्ठा पसरल्याचे आढळले होते. त्या वेळी आणि त्यानंतरही सातत्याने आम्ही पोलिसांकडे तक्रार करत आहोत. मात्र पोलिसांना अद्याप हे प्रकार थांबवता आलेले नाहीत. या प्रकारांचा महिलांना खूप मनस्ताप होतो. हे प्रकार आठवडय़ातून किमान एकदा तरी घडत असल्याने आता महिला आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, असा इशारा लता अरगडे यांनी दिला.