23 September 2020

News Flash

जिल्ह्य़ासाठी ७ हजार कोटींचा पतपुरवठा

जिल्ह्य़ाच्या चालू वर्षांच्या (२०१३-१४) ७ हजार ४५ कोटी ४३ लाख रुपयांच्या सुधारित वार्षिक पतपुरवठा आराखडय़ास जिल्हास्तरीय बँकेच्या समन्वय समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. प्राथमिक क्षेत्रासाठी

| June 27, 2013 01:48 am

जिल्ह्य़ाच्या चालू वर्षांच्या (२०१३-१४) ७ हजार ४५ कोटी ४३ लाख रुपयांच्या सुधारित वार्षिक पतपुरवठा आराखडय़ास जिल्हास्तरीय बँकेच्या समन्वय समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. प्राथमिक क्षेत्रासाठी या आराखडय़ातील तरतुदी ४७० कोटी ४७ लाख रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या आराखडय़ात ३८.३३ टक्के वाढ करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली. अग्रणी सेंट्रल बँकेचे विभागीय व्यवस्थापक पी. पी. नाचणकर, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक व्ही. आर. सोनटक्के, जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक राकेश पांगत, रिझव्‍‌र्ह बँकेचे धेंडे आदी या वेळी उपस्थित होते.
या आर्थिक वर्षांत जिल्ह्यासाठी ६ हजार ५७४ कोटी ९६ लाख रुपयांचा पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र सुधारित आराखडय़ात प्राथमिक क्षेत्रासाठी भरीव वाढ करून त्यासाठी आता ५ हजार ५३३ कोटी ४३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बिगर प्राथमिक क्षेत्रासाठी १ हजार ५११ कोटी ९३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्राथमिक क्षेत्रांतर्गत पीककर्जासाठी २ हजार ४१६ कोटी ४८ लाख, कृषी विकास कर्जासाठी १ हजार ४६१ कोटी २ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून एकुणात ती ७० टक्के आहे. लघुउद्योगासाठी ५६१ कोटी ८३ लाख, अन्य प्राथमिक क्षेत्रासाठी १ हजार ९४ कोटी १७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
संजीवकुमार यांनी या वेळी अग्रणी सेंट्रल बँकेचे कौतुक करून सर्व राष्ट्रीयीकृत बँका व सरकारी अधिकाऱ्यांनी या आराखडय़ाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचे सरकारी अनुदान आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी सर्व बँकांनी ही खाती उघडण्याची प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक सोनटक्के यांनी सुरुवातीला या आराखडय़ाची माहिती दिली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या सूचनेनुसार पतपुरवठा आराखडय़ाच्या प्राथमिक क्षेत्र तरतुदीत वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सोनटक्के या महिनाअखेर सेवानिवृत्त होत आहेत, त्याबद्दल त्यांचा या बैठकीत संजीवकुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2013 1:48 am

Web Title: credit provision of 7 thousand crore for district
टॅग District
Next Stories
1 गुन्हेगाराच्या शुभेच्छा फलकांमुळे पोलिसांचे पितळ उघडे
2 कृषी आराखडय़ासाठी कृषिमंत्री आग्रही
3 ‘मनपाने राजकीय आकसातून केडगावला वगळले’
Just Now!
X