क्रिकेटमध्ये केवळ गुणवत्ता असून चालत नाही, ती गुणवत्ता प्रत्येकवेळी पात्रतेप्रमाणे सिद्ध करावी लागते. तरच तुम्ही चांगले क्रिकेटर होता. आपल्याच धुंदीत रमून राहणे मोठय़ा क्रिकेटरला चालत नाही. त्यामुळे केवळ गुणवत्ता असून भागत नाही तर त्या गुणवत्तेला चिकाटी, एकाग्रतेची साथ हवी. तेव्हाच चांगले यश तुम्ही साध्य करू शकता, असे मत ‘चतुरंग’च्या मंचावरून ज्येष्ठ क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांनी व्यक्त केले.
‘चतुरंग’च्या रंगसंमेलनामध्ये यंदा नावीन्यपूर्ण संकल्पना राबवत ‘आजचे क्रिकेट, कालचे क्रिकेट’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. बापू नाडकर्णी, अजित वाडेकर आणि प्रवीण आंब्रे यांनी या परिसंवादामध्ये सहभाग घेतला होता तर द्वारकानाथ संझगिरी यांनी या तिघांशी संवाद साधला. बदलत्या क्रिकेटचा वेध घेताना आपल्या अनेक आठवणी या मान्यवरांनी यावेळी उपस्थितांना सांगितल्या. सुनील गावस्कर यांच्या खेळापासून या चर्चेला सुरुवात झाली. सुनील गावस्कर यांनी वेगवान गोलंदाजीला हॅल्मेटशिवाय कसे सामोरे जावे, हे दाखवून दिले तर अजित वाडेकर यांनी भारताबाहेर जिंकण्याची सवय लावली, असे संझगिरी यांनी सांगितले. फलंदाजाच्या पायाची हालचाल महत्त्वाची असते. मात्र वीरेंद्र सेहवाग याने मात्र स्वत:चे तंत्र विकसित केले आहे. त्याच्या शैलीचे कोडे ऑस्ट्रेलियालाही उलगडले नाही. त्यामुळे आता प्रशिक्षकही प्रत्येक खेळाडूची नैसर्गिक शैली वाढवण्याकडे भर देऊ लागले आहेत. ‘मोठय़ा खेळाडूसारखे खेळा’ असे सांगितले तर नव्या खेळाडूचे तंत्र मात्र मागे पडू शकते असे प्रवीण आंब्रे यांनी सांगितले.
बापू नाडकर्णी यांनी आपल्या आठवणींची चौफेर फटकेबाजी केली. सलीम दुराणी या खेळाडूकडे मोठी क्षमता होती. मात्र क्षमतांचा वापर करण्यासाठी लागणारी चिकाटी, सातत्य आणि एकाग्रता मात्र त्याच्याकडे नव्हती, त्यामुळे मोठय़ा क्षमतेचा हा खेळाडू मागे पडला असे नाडकर्णी म्हणाले.
सचिनच्या त्या पहिल्या बुटांची गोष्ट!
सचिन तेंडुलकर आणि प्रवीण आंब्रे शिवाजी पार्कमध्ये आचरेकरसरांकडे क्रिकेटचे धडे घेत असतानाची एक आठवण प्रवीण आंब्रे यांनी सांगितली. १९९० च्या अगोदरची ती घटना असून त्यावेळी फलंदाजांचे खास बूट भारतामध्ये मिळत नव्हते. त्यावेळी प्रवीण केनियाच्या दौऱ्यावर असताना त्याने तेथून फलंदाजांसाठीचे बूट आणले होते.
सचिनला ते बूट आवडले होते आणि ते बूट देण्यासाठी प्रवीणने सचिनला शतक करण्याची अट घातली होती. सचिननेही ते आव्हान स्वीकारत शतक करून ते बूट मिळवले होते. हा किस्सा आपण विसरलोही होतो. मात्र सचिन त्याच कंपनीचा ब्रॅंन्ड अ‍ॅम्बॅसिटर झाल्यानंतर त्यानेच ही गोष्ट सांगितली होती, असे प्रवीण आंब्रे याने यावेळी सांगितले.