बालविवाह केल्याप्रकरणी संगमनेर, पारनेर तसेच पुणे जिल्हय़ातील एकूण १९ आरोपींच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपीसह एका प्राथमिक शिक्षकास अटकही करण्यात आली असून, इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. विशेष म्हणजे या बालवधूनेच फिर्याद दिली आहे.
तालुक्यातील काताळवेढे येथील सोळावर्षीय अल्पवयीन मुलीने पारनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेच्या शेवटच्या आठवडय़ापासून डिसेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ाच्या कालावधीत तालुक्यातील मांडवेखुर्द येथील सुदाम भास्कर खामकर तसेच त्याची आई ताराबाई भास्कर खामकर यांनी या अल्पवयीन मुलीस काताळवेढे येथून शिर्डी येथे नेले. तेथून तालुक्यातील मांडवेखुर्द तसेच पुणे जिल्हय़ातील डिंगोरे येथे नेले. तेथे घेऊन जाताना फिर्यादी मुलीस निर्जनस्थळी नेऊन तिच्याशी लगट तसेच शारीरिक छेडछाड करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यानंतर सुदाम तसेच त्याची आई ताराबाई यांनी तसेच त्यांच्या इतर नातेवाइकांनी संगनमताने सुदाम याच्याशी धार्मिक पद्घतीने विवाह लावून दिला.
चुलतीच्या मदतीने अत्याचारित मुलीने पारनेर पोलीस ठाण्यात येऊन आपली फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपी सुदाम भास्कर खामकर, त्याची आई ताराबाई भास्कर खामकर, वडील भास्कर रामभाऊ खामकर यांच्यासह संगमनेर तालुक्यातील साकूर येथील रहिवासी तसेच प्राथमिक शिक्षक विजय एकनाथ कांबळे, निर्मला सुदाम खामकर, संतोष एकनाथ कांबळे, वैशाली विजय कांबळे, सोनाली संतोष कांबळे, रंजना एकनाथ कांबळे, एकनाथ खंडू कांबळे, रामदास खामकर, उज्वला खंडू बो-हाडे, खंडू बो-हाडे, गणेश खंडू बो-हाडे, सचिन खंडू बो-हाडे, मनीषा गणेश बो-हाडे, तसेच भटजी समुद्र यांच्यासह पुणे जिल्हय़ातील डिंगोरे येथील योगेश खंडू बो-हाडे यांच्या विरोधात अल्पवयीन मुलीचे अपहरण, महिलेला विवाहाची सक्ती किंवा शील भष्ट करण्याच्या उद्देशाने अपहरण करणे, विनयभंग व फौजदारी गुन्हापात्र बलप्रयोग करणे यासह बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे कलम ५ व ६ नुसार सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी सुदाम खामकर तसेच प्राथमिक शिक्षक विजय एकनाथ कांबळे यांना अटक केली आहे.