सोलापूर महापालिका आयुक्तांनी पालिकेच्या कारभाराचा गाडा रूळावर आणताना गरजेनुसार कठोर पावलेही उचलली आहेत. यात बेकायदेशीर नळ जोडणी करून घेऊन पाण्याची चोरी करणा-यांविरूध्द फौजदारी कारवाईची धडक मोहीमही हाती घेण्यात आली आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक सुनील खटके यांच्यासह गवळी वस्ती भागातील २७ जणांविरूध्द पालिका प्रशासनाने पाणी चोरीची फिर्याद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. या मोहिमेमुळे पाणी चोरी करणारी मंडळी अडचणीत आली आहेत.
पालिका आयुक्त गुडेवार यांनी पालिकेच्या कारभारतील अनेक वर्षांपासून चाललेला गलथानपणा दूर होऊन त्यात सुधारणा होण्याच्या दृष्टीने खंबीर पावले उचलली आहेत. शहरात मिळकतदारांची संख्या आणि खासगी नळांची संख्या यात मोठी तफावत आहे. ब-याच ठिकाणी बेकायदा नळजोडणी असल्यामुळे महापालिकेच्या महसुलावर परिणाम झाल्याचे वारंवार दिसून आले आहे. परंतु आतापर्यंत अवैध नळजोडणींची शोध मोहीम व्यापक प्रमाणात घेण्यात आली नव्हती. तसेच अशा अवैध नळजोडणीधारकांना कारवाईचा हिसकाही दाखविण्यात आला नव्हता.
तथापि, आयुक्त गुडेवार यांच्या आदेशानुसार पालिकेतील मंडळ अधिकारी दीपक पवार यांनी गवळी वस्ती, दमाणी नगर, लक्ष्मी पेठ या भागात अवैध नळजोडणीची शोध मोहीम घेतली. ज्यांच्या घरात नळजोडणी आहे, त्यांच्याकडे पावतीची मागणी केली असता काही मिळकतदारांकडे नळजोडणीच अवैध असल्याचे आढळून आले. अशा २७ मिळकतदारांची यादी तयार करून त्यांच्याविरूध्द थेट फौजदारी कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईत माजी नगरसेवक सुनील पांडुरंग खटके यांच्यासह परशुराम दादा आसबे, उत्तर बाबुराव वाघमोडे, ज्ञानेश्वर शंकर हुणचीकट्टी, दत्तात्रेय औदुंबर पवार, अमृत गणपत सलगर, अरिवद कारभारी कोिथबिरे, बाबुलाल खाजा शेख, जयप्रकाश आशप्पा मंठाळकर, शंकर दत्तात्रेय चव्हाण, देवराव नारायण सुरेराव, मकबुल बंदगी शेख, धर्मा धोंडीराम चव्हाण, राजू दत्तात्रेय सुरेराव, अरूण पांडुरंग सलगर, अशोक शिवाजी घोगरे, चंद्रकांत श्रावण मोरे, बब्रुवान सिद्राम सोनकांबळे, गोिवद गेनू रोकडे, बाबू गेनू रोकडे, माताबाई जयसिंग गोरखा, एस. एस. सूर्यवंशी, कादरखान रूस्तूम, सोनाबाई शिवाजी कोळेकर, लक्ष्मीबाई मारूती भगरे व निरंजन पाटलोबा पाटील हे मिळकतदार महापालिकेची बेकायदेशीर नळजोडणी घेऊन पिण्याचे पाणी चोरून वापरत असताना आढळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.