केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने सोलापूर शहरात महानगरपालिकेने गलिच्छ वस्ती भागात राबविलेल्या शौचालय योजनेत झालेल्या ७२ लाख २८ हजारांच्या घोटाळय़ाप्रकरणी पालिकेचे आरोग्य अधीक्षक महादेव डोणज, आरोग्य निरीक्षक ईरण्णा बिराजदार व मक्तेदार भारत मनसावाले यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यासंदर्भात पालिकेचे अधिकारी शांताराम अवताडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लष्कर-लोधी गल्ली भागात शौचालय योजना हाती घेण्यात आली होती. या ठिकाणी ९१ लाख २७ हजार खर्चाचे शौचालय उभारणीचे काम होते. परंतु लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम अदा न करता त्यांची तसेच शासनाची आणि महापालिकेची फसवणूक झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी झालेल्या चौकशीत मक्तेदार मनसावाले याच्यासह पालिका आरोग्य अधीक्षक डोणज व आरोग्य निरीक्षक बिराजदार यांचा सहभाग दिसून आला. त्यामुळे पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार या तिघांविरुद्ध फौजदारी कारवाई करावी लागली. या प्रकरणाची आणखी चौकशी झाल्यास हा घोटाळा एक कोटीच्या घरात जाण्याची शक्यता पालिका सूत्रांनी व्यक्त केली आहे.