दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणाची जगभरात निर्भर्त्सना झाल्यानंतरही महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.  समाज अत्याचार पीडितेच्या बाजूने उभा राहतो, असा एक सकारात्मक संदेश देशभरात गेला आणि महिलांनीही त्यांच्यावरील अत्याचारांची गाऱ्हाणी दोन पावले पुढे येऊन पोलीस ठाण्यात नोंदविण्यास सुरुवात केली.
इतर राज्यांच्या तुलनेत महिलांवरील अत्याचार महाराष्ट्रात कमी असून राज्यातील गुन्ह्य़ांमध्ये २.५ टक्क्याने घट झाली असल्याची माहिती गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत दिली. मात्र पुढील अधिवेशनात ही आकडेवारी कदाचित वाढलेली असेल कारण महिला मोठय़ा संख्येने अत्याचाराला वाचा फोडू लागल्या आहेत. पोलीस, जनप्रतिनिधी आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे त्रासलेल्या नागपूरच्या महिलांनी तर गुंडांच्या विरोधात दंड थोपटले आहे. काही वर्षांपूर्वी  कस्तुरबानगरातील अक्कु यादवला महिलांनीच ठेचून मारले, त्यानंतर पांढराबोडीच्या महिलांनीही गुंडांना ठेचून काढले आणि गेल्या सप्टेंबरमध्ये नाईक झोपडपट्टीतील महिलांनी इक्बालला ठेचून मारले. वैदर्भीय संस्कृतीत अन्याय सहन करणार नाही, अशी उपजत प्रवृत्ती उपरोक्त घटनांमधून दिसून येते.
बसस्थानक, रेल्वेस्थानक, शाळा व महाविद्यालयाचा परिसर, लग्न समारंभाबरोबरच कोणताही बाजार हा महिलांच्या विनयभंग व छेडखानीचे ठिकाण असू शकते. कॉटन मार्केटमधील घटना याच आठवडय़ातील आहे. हारा उचलताना महिलेच्या शरीराला स्पर्श करणे, अश्लील शब्द उच्चारणे हे प्रकार कॉटन मार्केटसह, फळ बाजार, धान्य बाजार, कळमना बाजारात सर्रास चालू असतात. व्यापारी, अडते, शेतकरी, दलाल एवढेच नव्हे ऑटोचालक, सायकल रिक्षाचालक, वजनकाटा करायला येणारे तरुण, चहावालेही महिलांशी संधी मिळेल तेव्हा लगट करण्याचा प्रयत्न करतात. गरीब महिला पोलिसांच्या भरवशावर किती दिवस स्वत:ची सुरक्षा करणार? प्रत्येकवेळी पोलीस ठाण्यात जात बसल्या तर त्यांच्या चुली कशा पेटणार? त्रास असह्य़ झाला तर महिला गुंडाचा जीव घ्यायलाही मागेपुढे पहात नाहीत, हे यापूर्वीच्या उदाहरणांवरून सिद्ध झाले आहे. आंधळ्या, मतिमंद मुली कोणता विरोध करणार? ८० वर्षांच्या आजीवर नातू बलात्कार करतो. दाभ्यातील एका अल्पवयीन मुलीवर तिच्या बापाने व भावाने वर्षभर बलात्कार केला. चार भिंतीच्या आत बाप, भाऊ, शेजाऱ्यांच्या वासनेला बळी पडलेल्या मुलींची संख्या प्रचंड आहे.
महिला अत्याचारांमध्ये महाराष्ट्राचा देशात १८वा क्रमांक आहे. बलात्कारात महाराष्ट्र २४ व्या क्रमांकावर आहे. नोव्हेंबर २०११पर्यंत नोंदवलेल्या बलात्कार प्रकरणांमध्ये ८६१ बलात्कार हे ओळखीच्या लोकांकडून झाल्याची आकडेवारी आर.आर. पाटील यांनी सादर केली आहे. भ्रूण हत्या, आत्महत्या, कौटुंबिक हिंसाचार आणि कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ अशा चाळण्यांमधून बाहेर पडून आज कितीतरी महिला स्वत:ची  वेगळी प्रतिमा त्यांच्या व्यवसायात निर्माण करीत आहेत. महिलांना असुरक्षित करून खरोखरच समाज पुढे जाऊ शकतो का? हाही विचार समाजातील सर्व सूज्ञ नागरिकांनी करायला हवा.     (समाप्त)