पोलीस असल्याची बतावणी करून महिलांचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा ८ च्या पथकाने अटक केली आहे. रवी वर्मा असे या आरोपीचे नाव असून तो प्रथितयश इस्टेट एजंट आहे. आतापर्यंत १४ महिलांना त्याने अशा प्रकारे आपले सावज बनविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
 ७ फे ब्रुवारी रोजी विलेपार्ले येथे राहणाऱ्या एका डॉक्टर महिलेच्या घरी एक फोन आला. मी पुणे क्राइम ब्रांचमधून बोलतोय असे त्या इसमाने सांगितले. तुमच्या पतीला सेक्स स्कँडलमध्ये अटक झालीय असे सांगितले. या डॉक्टरचा पती त्यावेळी जर्मनीत होता. तिने तसे सांगताच जर्मनीतून पतीला अटक केली आहे आणि त्याला सोडायचे असेल तर मला त्वरित भेटायला या आणि पतीला अजिबात संपर्क करू नका असे सांगितले. या महिलेने त्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्याला भेटायला वाशीच्या रघुलीला मॉलमध्ये गेली. मॉलच्या वरील निर्जन जागेवर त्या इसमाने तिला पतीला सोडायचे असेल तर शरीरसंबंध ठेवावे लागतील अशी मागणी केली. त्यानंतर या महिलेचा विनयभंग केला. यानंतर तुझा पती घरी परतेल असे सांगून पळ काढला. पोलीस उपायुक्त मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा ८ च्या पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे, पोलीस निरीक्षक पंढरीनाथ व्हावळ, राजू कसबे, सुधीर दळवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गावशेते आदींच्या पथकाने तपास सुरू केला आणि नवी मुंबईतून रवी वर्मा याला अटक केली. चोरलेल्या मोबाइलमधून वर्मा महिलांना असे फोन करत होता. आतापर्यंत त्याने १४ महिलांना अशापद्धतीने फसवून त्यांचा विनयभंग केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. यापूर्वी त्याला ठाणे आणि खारघर पोलिसांनी अशाच गुन्ह्य़ांमध्ये अटक केली होती. त्याच्या कार्यपद्धतीबाबत बोलताना फटांगरे यांनी सांगितले की, तो अंदाजाने कुणाच्याही घरचे लॅण्डलाइन फोन क्रमांक फिरवायचा. महिलेने फोन उचलला की तो पोलीस आहे आणि सेक्स स्कँडल या घरातून सुरू आहे, नवऱ्याला अटक केली आहे, असे सांगायचा. महिला घाबरली की पुढचे जाळे टाकायचा आणि तिला अडकवायचा. अनेकांना तो निर्जन जागेत बोलवायचा. या काळात तो महिलांना पतीशी किंवा अन्य कुणाशी बोलण्याची संधी देत नव्हता.