एका भोंदू महिलेमुळे कुटुंबाला हकनाक त्रास सोसावा लागल्याचा राग मनात ठेवून तिला धडा शिकवण्यासाठी म्हणून इतरांना खंडणीसाठी धमकावणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखा ११च्या पोलिसांनी नाशिक येथून नुकतीच अटक केली. यतीन जनानी असे या तरुणाचे नाव आहे. या महिलेच्या नावाने यतीनने इतरांना खंडणीसाठी मोबाइलवरून एसएमएस पाठवले होते.
चारकोप येथील एका इस्टेट एजंटच्या मोबाइलवर २ ऑगस्ट रोजी पाच लाख रुपये खंडणी मागणारा एसएमएस आला. खंडणी न दिल्यास मुलीचे अपहरण करण्याची धमकी एसएमएसमध्ये देण्यात आली होती. या एसएमएसमध्ये एक मोबाइल क्रमांकही देण्यात आला होता. मात्र, हा क्रमांक विरारमधील एका महिलेचा होता. पोलिसांनी चौकशी केल्यावर तिचा या प्रकरणाशी काहीच संबंध नसल्याचे निष्पन्न झाले. ज्या मोबाइल क्रमांकावरून धमकीचा एसएमएस आला, तो क्रमांकही बंद होता. याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखा ११च्या पथकाने सुरू केला आणि नाशिकवरून यतीन जनानी याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश सावंत यांनी दिली.
जनानी हा विरारमध्ये रहायचा. त्याचा भाऊ मयूर विरार येथील एका महिलेच्या नादी लागून देशोधडीला लागला होता.
आपल्या कुटुंबियांना या महिलेमुळचे विस्थापित व्हावे लागले याचा राग यतीनच्या मनात होता. त्यामुळे तिचा बदला घेण्यासाठी यतीनने तिच्या नावाने खंडणी मागण्याची योजना बनवली होती. दैनिकांमध्ये व्यवसायाच्या जाहिराती देणाऱ्या व्यापाऱ्यांचे मोबाइल क्रमांक मिळवून त्याने हे धमकीचे मेसेजेस पाठवले होते. किमान १० ते १२ व्यापाऱ्यांना त्याने अशाप्रकारे धमकी दिल्याचे सांवत यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव, रईस शेख, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे आदींच्या पथकाने कारवाई करून धमकी देणाऱ्या जनानी याला अटक केली.