शहरातील काकासाहेब बर्वे स्मृती कन्या छात्रालयाच्या सचिवाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. छात्रालयातील एका १३ वर्षांच्या विद्यार्थिनीने विनयभंगाची तक्रार केली असून या दोन्ही घटनांमधील संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छात्रालयाच्या माजी अधीक्षिका सुशीला मोरे यांनी छात्रालयाच्या सचिवाविरुद्ध तक्रार दिली आहे. हे सचिव छात्रालयाच्या आवारातच राहतात. अंतर्वस्त्रातच वावरतात. छात्रालयातील विद्यार्थिनींना खोलीत बोलावतात. नकार देणाऱ्या विद्यार्थिनींना मारहाणही करतात. यासंदर्भात संस्थेकडे तक्रार केल्यास थेट कार्यकारिणीवरच दबाव आणून सचिव त्यांच्या अपेक्षेप्रमाणे कामे करून घेतात. १९ जुलै रोजी त्यांनी आपल्या घरातील जलवाहिनी तोडली. त्याचा जाब विचारताच त्यांनी आपणावर हात उगारत जातिवाचक शब्द वापरले. या वेळी दोघांनी आपला हात धरून धक्काबुक्की केली. सचिव छात्रलयातील मुलींशी असभ्य वर्तन करीत असल्याचाही आरोप मोरे यांनी केला आहे. दरम्यान एका १३ वर्षांच्या विद्यार्थिनीने दीपकिशोर मोरेविरुद्ध विनयभंग केल्याची तक्रार केली आहे. १३ ऑक्टोबर रोजी रात्री दीपकिशोरने आपल्याशी असभ्य वर्तन केले. या वेळी त्यास हटकले असता त्याने धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
एकतर्फी प्रेमातून वादावादी
धुळ्यातील देवपूर भागात एकतर्फी प्रेमातून झालेल्या वादाचे पर्यवसान भांडणात होऊन पोलिसांनी परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
करण वाघमारे (१९) याने दिलेल्या फिर्यादीनुसार आपण प्रफुल्ल शिंदे यांच्या मुलीला सोबत नेले म्हणून वाद घालून मारहाण व जातिवाचक शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी प्रफुल्ल शिंदे (४२), लीलाबाई शिंदे (६६), वैशाली शिंदे (३७), तुषार शिंदे व दुर्योधन शिंदे (सर्व रा. एसटी कॉलनी, देवपूर) यांच्या विरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तर, १७ वर्षांच्या विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार करण हा सतत आपल्या पाठीमागे येत असे, शिट्टी वाजवून त्रास देत असे. २३ ऑक्टोबर रोजी त्याने आपल्याशी असभ्य वर्तन केले. याचा जाब विचारताच करणसह उमाबाई वाघमारे व अमर वाघमारे यांनी आपणास धक्काबुक्की केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. करणने एकतर्फी प्रेमातून हा प्रकार केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
मारहाणीत दोन जण जखमी
दोघांनी लाकडी दांडय़ाने मारहाण केल्याने देवपूर भागातील नेहरूनगर परिसरात देविदास गांगुर्डे (४४) आणि ललिताबाई गांगुर्डे (३६) जखमी झाले. २३ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता घरासंदर्भात वाद घालून दोघांनी मारहाण केल्याचे गांगुर्डे यांचे म्हणणे आहे. दोघांवरही धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.