खून, लूटमार, अपहरण आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्य़ांमध्ये महाराष्ट्रात २०११ साली गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत वाढ झाली आहे. गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण २००९ साली ९.५ टक्के आणि २०१० साली ९ टक्के असताना २०११ साली मात्र यात घट होऊन ८.२ टक्क्यांवर आले आहे. महाराष्ट्रातील गुन्हेगारीच्या आलेखावर आधारित १४ वा वार्षिक अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
अहवालातील आकडेवारीनुसार दरोडय़ाच्या घटनांमध्ये मागील दोन वर्षांच्या तुलनेत झालेली २०११ साली झालेली वाढ अत्यंत चिंताजनक आहे. यात १४.२ टक्के वाढ दाखविण्यात आली आहे.
महाराष्ट्रात २०११ साली ४२४९ दरोडय़ांची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ अपहरण आणि बळजबरीने खंडणी वसुलीचे १६६९ गुन्हे घडले. ही वाढ १०.७ टक्के आहे. खुनाच्या प्रयत्नांचे २१०५ (वाढ ९.३ टक्के), बलात्कार १७०१ (६.४ टक्के वाढ), फसवणूक ९०९८ (४.८ टक्के वाढ), विनयभंग ३७९४ (३.६ टक्के वाढ) आणि खून २८१८ (२.७ टक्के वाढ) अशी वाढ झाल्याने पोलीस खाते हादरले आहे.
संपत्तीशी संबंधित गुन्हे जसे दरोडा, लुटमार (७७३ प्रकरणे) आणि चोरी (५३४४९) यातही वाढ झाली आहे. महाराष्ट्रात चोरीच्या प्रकरणात ४५१ कोटी रुपयांचा माल चोरीस गेला आहे. परंतु, मुद्देमाल हस्तगत होण्याचे प्रमाण फक्त २७ टक्के आहे. संपत्तीशी संबंधित गुन्ह्य़ांची उकल होण्याचे प्रमाण ५३ टक्के आहे.
गेल्या दोन वर्षांत आर्थिक गुन्ह्य़ांच्या घटनांतही ३ टक्के वाढ झाली आहे. यातील बहुतांश आर्थिक गुन्हे सुशिक्षित युवक-युवतींनी केले आहेत.
ज्या गुन्ह्य़ांमध्ये घट झाली त्यात हुंडाबळी (१३.७ टक्के घट), लैंगिक छळवणूक (९.२ टक्के), चलन फसवणूक (९.८ टक्के घट), सदोष मनुष्यवध, बेफिकिरीने एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे, कौटुंबिक हिंसाचार या गुन्ह्य़ांचा समावेश आहे.
महिलांविरुद्धच्या काही गुन्ह्य़ांत वाढ झाली आहे. यात देहविक्रयासाठी महिलांचा व्यापार, अपहरण आणि खंडणी वसुली, बलात्कार, हुंडय़ासाठी ठार मारण्याचा प्रयत्न या गुन्ह्य़ांचा समावेश आहे.