काही वर्षांत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस दलाला बऱ्यापैकी यश आल्याने मालेगावातील गुन्हेगारी कमी झाल्याचे जाणवले होते. मात्र अलीकडे काही घटनांमुळे गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढल्याचे दिसत आहे. पोलिसांच्या एकूण वादग्रस्त कार्यपद्धतीमुळे नागरिक व पोलिसांमधील दरीदेखील वाढत असल्याचे दिसून येत आहे.
चार महिन्यांपूर्वी मालेगावच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी रुजू झालेले सुनील कडासने हे पूर्वी नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे कार्यरत असताना पोलीस-जनता मैत्रीसाठी त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे चांगलेच चर्चेत होते. त्यामुळे त्यांच्याविषयी मालेगावकरांच्याही अपेक्षा वाढल्या होत्या. अद्याप तरी या अपेक्षांची पूर्ती होताना दिसत नाही. उलट पोलिसांविषयी नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
या पूर्वीचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रशेखर चौगुले यांनी निर्माण केलेल्या दराऱ्यामुळे गुन्हेगारांची पाचावर धारण बसली होती. अर्थात काही बाबतीत चौगुले यांची कार्यपद्धती वादग्रस्त ठरली असली तरी त्यांच्या काळात गुन्हेगारीच्या प्रमाणात विलक्षण घट झाली होती. मालेगावी रुजू होताना कडासने यांनी लोकाभिमुख प्रशासन देतानाच पोलिसांच्या प्रति जनतेत दृढ विश्वास निर्माण करण्याचा इरादा बोलून दाखवला होता.
मात्र गेल्या काही दिवसांत शहर व तालुका परिसरात हत्या, जीवे मारण्याचा प्रयत्न, गावठी कट्टय़ांचा खुलेआम वापर, घरफोडय़ा, समाजकंटकांची झुंडशाही, सर्वसामान्यांची फसवणूक, यांसारख्या घटना वाढल्याचे दिसत आहे. बहुतांश प्रकरणांमध्ये संशयितांना शोधण्यात पोलिसांना अपयश येत आहे.
शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील महेश नगरमध्ये दीड महिन्यापूर्वी एका वृद्धेची हत्या झाली. घरातील रोख रक्कम व दागिने गायब असल्याने चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचे वरकरणी दिसत असले तरी दिशाभूल करण्यासाठी मारेकऱ्यांचा तो बनाव असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. संबंधित इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एकटीच राहणारी ही वृद्धा सुखवस्तू कुटुंबातील होती. तसेच एकंदरीत संशयास्पद मामल्यामुळे परिचित व्यक्तिंचेच हे कृत्य असावे असा संशय व्यक्त करत लवकरच संशयितांना जेरबंद करू अशी खात्री पोलिसांनी दिली होती. मात्र अद्याप धागेदोरे हाती लागले नसल्याचे दिसून येत असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहराच्या पश्चिम भागात समाजकंटकांकडून एका प्रार्थना स्थळापासून ठरावीक अंतरापर्यंत धर्मग्रंथाची पाने फाडून ती रस्त्यावर फेकून दिल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. लोकांनी संयम दाखविल्याने काही होऊ शकले नाही. समाजात तेढ निर्माण करण्याचाच हा इरादा असल्याची शक्यता प्रथमदर्शनी स्पष्टपणे दिसून येते. याही प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
अलीकडेच शहराच्या नवीन बस स्थानक परिसरात राज्य राखीव दलाच्या दोन जवानांविरोधात एका तरुणीचा विनयभंग केल्यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला. त्या वेळी जमावाने संबंधित तरुणी व एका जवानास दांडगाई करत एका खासगी ठिकाणी काही काळ डांबून ठेवले होते. पोलिसांना धाव घेत या जवानाची सुटका करावी लागली. दुसरा जवान पसार झाल्याने तो जमावाच्या तावडीतून वाचला. दोन्ही जवानांवर पोलीस कारवाई झाली, पण जमावाविरुद्ध कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही.
 काही वर्षांपूर्वी एका घटनेत तरुण न्यायाधीशाला अशाच तऱ्हेने डांबून ठेवण्याची घटना मालेगावात घडली होती.
फसवणुकीच्या घटनांचे प्रमाणही वाढले आहे. नोव्हेंबरमध्ये सकाळी सरदार चौक परिसरात फिरावयास गेलेल्या एका महिलेला तोतया पोलिसांनी चोरटय़ांची खोटी भीती दाखवत तिच्या अंगावरील दागिने बेमालूमपणे लंपास केले.
बजरंग कॉलनी परिसरात एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकास तोतया सीआयडी अधिकाऱ्यांनी अशाच तऱ्हेने गंडविल्याची घटना घडली. दवाखान्यात निघालेल्या या व्यक्तीस तिघांनी रस्त्यात अडवून गांजा पितात म्हणून दरडावण्यास सुरुवात केली. नंतर हातातील अंगठी व खिशातील रोख रक्कम एका रुमालात ठेवण्यास त्यांनी भाग पाडले.  काही वेळातच या ऐवजासह हे भामटे पसार झाले. विशेष म्हणजे या दोन्ही घटना अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी घडल्या. त्यावरून गुन्हेगारांचे निर्ढावलेपण अधोरेखित होते.अशा घटनांमध्ये पोलिसांकडून तक्रारदारालाच अनेकदा मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत.