टमटम चालकास मारहाण करून दोन तोळे सोन्याची साखळी व रोख रक्कम लुबाडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांसह ११जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात दरोडय़ाचा गुन्हा नोंदविण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
तालुक्यातील बाबीचा टमटमचालक ज्ञानेश्वर साळुंके हा १६ जानेवारीला नेहमीप्रमाणे प्रवासी वाहतूक करीत होता. शहरातील तुळजापूर नाका येथे दुपारी एमएच २५ बी ४१६ व एमएच २५ बी ३९८ या क्रमांकांच्या दोन काळय़पिवळय़ा जीपमधून १२ ते १५जणांचा घोळका खाली उतरून टमटमसमोर थांबला. हातातील चाकू, हॉकीस्टिक, चेन व काठीने साळुंकेस जबर मारहाण केली व त्याच्या गळ्यातील सोन्याची दोन तोळ्यांची साखळी हिसकावली. साळुंकेसोबत असलेल्या संगमेश्वर जाधव यांच्या खिशातील ५ हजार रुपये रोकडही काढून नेल्याची तक्रार साळुंके यांनी न्यायालयात दिली. जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले. न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. राष्ट्रवादीचे नगरसेवक गुलमीर अजगरअली पठाण, खलिफा कुरेशीसह इम्रान पठाण, अशर शब्बीर सवार, फक्रोद्दीन मैन्नोद्दीन पठाण, मसूद इसाक शेख, युनूस इलाख शेख, अमीर वाजीद पठाण, शेख नबी शमशोद्दीन या ११जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.