पोलीस ठाण्याच्या बाहेर विविध गुन्ह्य़ांची माहिती देणारे बारीक अक्षरातील फलक, शहरात एखाद्या मोक्याच्या ठिकाणी कोपऱ्यात लागलेला छोटासा जनजागृती फ्लेक्स, सामाजिक संघटनांनी भित्तिपत्रके चिकटवून उचललेला समाज प्रबोधनाचा विडा यासारख्या मर्यादित जनजागृतीची साखळी तोडून नवी मुंबई पोलिसांनी व्यापक जनजागृतीचा महायज्ञ प्रज्वलित करण्याचे ठरविले आहे. सात लाख पत्रकांद्वारे शहरातील प्रत्येक सोसायटीतील घरांचा उंबरठा गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अशाप्रकारे प्रत्येक घरात जनजागृतीचा दिवा लावण्याचे हे नवी मुंबई पोलिसांचे पहिलेच काम आहे. यात गुन्हे उघडकीस आणण्यापेक्षा गुन्हे प्रतिबंधक उपाययोजनांना अधिक महत्त्व देण्यात आले आहे.
एप्रिल, मे महिना आला की पोलिसांचा मानस्ताप वाढत असल्याचे दिसून येते. लग्नसराई आणि सहलीची धामधूम यामुळे याच काळात घरफोडी आणि चेन स्नॅचिंगच्या प्रकारात वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. त्यात आता सायबर गुन्ह्य़ांची भर पडली आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई शहराचे उपायुक्त शहाजी उमप यांच्या संकल्पनेतून एक अभिनव उपक्रम पोलिसांनी हाती घेतला असून, त्यात सर्व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना सामावून घेतले गेले आहे. घरफोडी, लहान मुलासंदर्भात घडणारे गुन्हे, संगणक, मोबाइल व इंटरनेटचा वापर करताना घ्यावयाची काळजी, प्रवासादरम्यान होणाऱ्या चोऱ्या, चैन चोरी व फसवणूक, वाहन चोरी, बँकेत व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, पासपोर्टसाठी, चरित्र पडताळणीसाठी लागणारी कागदपत्रे, जवळच्या पोलीस ठाण्याची हद्द, तेथील उच्च अधिकाऱ्यांचे दूरध्वनी व मोबाइल क्रमांक, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील शिक्षापात्र अपराध आणि वाहतुकीचे नियम, त्यांची चिन्हे यांची ठळक माहिती देणारी पत्रके प्रसिद्ध केली आहेत.
एका बंद लिफाफ्यात ही पत्रके प्रत्येक सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडे दिली जात असून, त्यांना त्यांच्या सोसायटीतील सर्व घरांत देण्याची अट घालण्यात आली आहे. ही पत्रके केवळ सदस्यांच्या घरातील दरवाजातून भिरकावून न देता, सोसायटीने सर्व सदस्यांच्या नावासमोर त्यांच्या सह्य़ा घेऊन स्थानिक पोलीस ठाण्याला ती यादी दाखल करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. या पत्रकातील प्रत्येक कोपरा जनजागृतीच्या कामात वापरण्याचा निश्चिय उमाप यांनी केला आहे. त्यासाठी लिफाफ्यावर बेटी वाचवा अभियानाचा संदेश देण्यात आला आहे. ‘सफल राष्ट्र का प्रण, हर बेटी को जीवन’ हा मंत्र या लिफाफ्यावर हसऱ्या मुलीच्या छायाचित्रासह प्रसिद्ध करण्यात आला आहे. बँकेत नियमित पैसे भरणाऱ्या व्यापाऱ्यांनी आपल्या मार्गात व वेळेत बदल करावा, घरात नसल्यास एखादा विद्युत दिवा २४ तास सुरू ठेवावा, बाजारात चोरीविरोधी अलार्म उपलब्ध आहेत, ते लावण्यात यावेत, लहान मुलांच्या समोर आर्थिक व्यवहाराचे भाष्य करू नका, गाडी पार्क केल्यानंतर गाडीतील लॅपटॉप हा कारच्या डिकीत ठेवा, लग्न समारंभाला जाताना महिलांनी दागिन्यांचे प्रदर्शन न करता पदपथावरून चालावे, कमी किमतीत वाहने विकणारे दलाल हे चोरीची वाहने विकण्याची शक्यता असल्याने वाहनांची पूर्ण तापसणी केल्यानंतरच ती घ्यावीत, वाहन दुरुस्तीला किंवा डागडुजीला देताना तिची चावी तेथील कामगारांकडे न देता ती रीतसर केंद्र निरीक्षकाकडे जमा करावी, गाडय़ांच्या चावीची नक्कल करून गाडय़ा नंतर चोरीला जात असल्याचे आढळून आले आहे.
इंटरनेटवर आपली मुले करतात काय, याची पाहणी करा. यासारख्या बारीक सूचनांचा अभ्यास करून, त्या समजतील अशा शब्दरचनेत मांडण्यात आलेल्या आहेत. पोलिसांची जनजागृती म्हणजे एक मोठा ताप अशीच एक धारणा नागरिकांची आहे, पण या जनजागृतीत आधुनिक यंत्राचा गैरवापर आणि त्यावरील उपाययोजना सांगण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने त्या घरात दरवाजाच्या आतील बाजूस कायमस्वरूपी चिकटवून ठेवण्यास हरकत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस दलाच्या पारंपरिक भाषेत ही पत्रके छापण्यात आलेली नाहीत. त्यासाठी अनेक अधिकाऱ्यांच्या सूचना आणि कल्पनाशक्तीचा वापर करण्यात आलेला आहे. एक लाख लिफाफ्यांचा हा संच आहे. त्यात सात पत्रके असून त्यांच्या दोन्ही बाजूंवर जनजागृतीचे संदेश लिहिण्यात आले आहेत. प्रथम ती वर्तमानपत्राद्वारे घरोघरी पोहचविण्यात यावी असे ठरले होते, पण ती सर्वच नागरिकांना मिळाली नसती. त्यामुळे ही संकल्पना अमलात आणण्यात आली असून, ‘पोलिसांची पत्र’ म्हणून नागरिकांनी ती जपून ठेवावीत अशी अपेक्षा आहे. जपून ठेवण्यापेक्षा त्यातील सूचनांचे पालन करावे असे अपेक्षित आहे. नागरिकांसाठीच ती खूप मेहनतीने बनविण्यात आलेली आहेत. वाढत्या लोकसंख्येबरोबर गुन्हेगारी वाढत आहे, पण गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंध हा सर्वोत्तम उपाय आहे. आपल्या नागरिकांनी ते ठरविले तर अशक्य असे काही नाही. नागरिक या पत्रकांना केराची टोपली दाखविणार नाहीत, याची खात्री आहे.
    -शहाजी उमाप, पोलीस उपायुक्त,
    नवी मुंबई पोलीस आयुक्तालय