गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीमध्ये पोलीस प्रशासनाने केलेल्या अनावश्यक लाठीमार हल्ल्यामुळे जखमी झालेल्या कार्यकर्त्यांंवर पोलीस प्रशासनाने जाचक गुन्हे नोंद करण्याचे कारस्थान रचले आहे. हे गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा अनावश्यक लाठीमार करणा-या अतिरिक्त पोलीस प्रमुख ज्योतीप्रिया सिंग यांच्यासह पोलीस कर्मचा-यांवर कडक गुन्हे दाखल करावेत, या मागणीचे निवेदन शुक्रवारी आमदार चंद्रकांत पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार डॉ. सुजित मिणचेकर या जिल्ह्य़ातील युतीच्या आमदारांनी पोलीस प्रमुख विजयसिंह जाधव यांची भेट घेऊन दिले.    
निवेदनात आमदार पाटील यांनी म्हटले आहे की, शांततेने सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकीमध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांंवर पोलीस प्रशासनाने दंडुकशाहीचा वापर केला आहे. जखमी कार्यकर्त्यांवर जाचक गुन्हे दाखल करण्याचे षड्यंत्र रचणे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. शांततेचे आवाहन करून मिरवणूक मार्गस्थ करण्याचा आमदार क्षीरसागर यांचा प्रयत्न असतांना त्यांच्यावर विविध जाचक गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. कार्यकर्त्यांवरील जाचक गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा आम्हीही मानवाधिकार विभागाकडे याची तक्रार करून संबंधित पोलीस अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यास प्रशासनास भाग पाडू, असा इशारा आमदार पाटील यांनी पत्रकात दिला आहे.    
आमदार क्षीरसागर म्हणाले, जनतेशी लढताना अनेक वेळा प्रशासनाशी झालेल्या वादाचा सूडच या मिरवणुकीव्दारे पोलिसांनी घेतला आहे. ज्या जनतेने मला आमदार केले त्याच जनतेवर पोलीस प्रशासन अमानुष लाठीमार करत असेल तर बघ्याची भूमिका घेणे माझ्या रक्तात नाही. प्रत्यक्ष घटनेवेळी मी मंडळाच्या कार्यकर्त्यांंना मिरवणूक सरकती ठेवण्याचे आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करीत होतो. कार्यकर्तेही शांततेने व सबुरीने मिरवणूक पुढे नेत होते, पण अनावश्यक दडपशाही आणि दहशत निर्माण करीत अतिरिक्त पोलीस प्रमुख ज्योतीप्रिया सिंग, पोलीस उपअधीक्षक वैशाली माने यांनी केलेल्या लाठीमारामुळे परिस्थिती बिघडली. आमदार नरके व आमदार डॉ. मिणचेकर यांनीही आपली भूमिका यावेळी स्पष्ट केली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव व किशोर घाटगे उपस्थित होते.