जम्मू-काश्मीरपेक्षा ईशान्य भारताचे प्रश्न मोठे आहेत. या प्रश्नांची उत्तरे आता दिल्लीत मिळणार नाहीत तर ती देशाच्या छोटय़ामोठय़ा शहरात आणि गावातूनच मिळू शकतात. यासाठी भारताच्या अंतर्गत भागातून जाणीव जागृती चळवळ उभारायला हवी, असे मत सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी व्यक्त केले.
वाई शहर व तालुका पत्रकार संघ आणि मकरंद पत्रकार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संजय नहार ‘जम्मू-काश्मीर आणि आपण’ या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाला आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, पंचायत समिती सभापती सुनीता शिंदे, तहसीलदार सुनील चंदनशिवे, पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शरद अभ्यंकर होते.
जम्मू-काश्मीरचा प्रश्न हा बराचसा भावनिक आहे. तेथील प्रश्न सोडवायचा असेल, तर मागील काही हजार वर्षांच्या इतिहासात जावे लागेल. तो बंदुकीने अजिबात सुटणार नाही. काश्मीरला सुफी संतांची परंपरा आहे. तेथील संस्कृती-परंपरांचा अभ्यास व आदर करूनच हा प्रश्न सोडवावा लागेल, असं सांगून संजय नहार म्हणाले, काश्मीरची फाळणी होऊ न देता संपूर्ण काश्मीर एक तर स्वतंत्र राष्ट्र करणे अथवा हिंदुस्थानात विलीन होणे हा एवढाच पर्याय राजा हरिसिंहासमोर होता. जम्मू-काश्मीर भारतात विलीन झाल्यावर जे युद्ध झाले, त्यामुळे काश्मीर विभागला गेला. सध्या जम्मू-काश्मीर व कारगिल या तीन भागात आहे. सध्याच्या जम्मू-काश्मीरमध्ये भारताविषयी राग आहे की आपण त्यांना भारतीय मानत नाही याचा, हा मूळ प्रश्न आहे. तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताविषयी अत्यंत आदर आणि प्रेम आहे. या भागातील दोन खासदारांनी भारतीय सीमेवर येऊन भारताच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्याची  दखल भारतातील मीडियाने घेतली नाही.
जम्मू-काश्मीरच्या प्रश्नात भारत पाकिस्तानपेक्षा इतर मोठय़ा देशांना जास्त रस आहे. त्यांना हा प्रश्न अवघड करायचा आहे. त्याचा थेट संबंध या देशांच्या अर्थव्यवस्थेशी येतो. त्यासाठी या देशांचा हा प्रश्न भिजत पडलेला दाखवायचा आहे. हाच भारत पाकसाठी धोक्याचा इशारा आहे.
जम्मू-काश्मीर फार सुंदर आहे म्हणून चांगला आहे असं नाही तर तेथील संस्कार, संस्कृती, परंपरा, आदरातिथ्य यांनीही परिपूर्ण आहे. तेथील स्त्रियांनाही सर्व गोष्टींची जाणीव असून त्यांना कधी व कशासाठी बंड करायचे हे चांगले माहीत आहे. भारतीयांनी जम्मू-काश्मीरला समजावून व सामावून घेण्याची गरज आहे. त्या प्रदेशाविषयी असणारा द्वेष, राग घालवावाच लागेल.
श्री. नहार पुढे म्हणाले, शहिदांची या प्रदेशात परंपराच झाली आहे. ज्या कुटुंबातील कर्ते पुरुष, स्त्रिया मारले गेले, ज्यांची कुटुंबव्यवस्था काही मूठभर लोकांनी उद्ध्वस्त केली. अनेक मुले, मुली, महिला, वृद्ध अनाथ झाले. त्यांच्याविषयी आपण प्रेम दाखवू शकलो नाही हे आपले दुर्दैव आहे. आपल्या देशात मुंबई, नक्षलवादी क्षेत्रात, बोडो, नागा आंदोलनात व सरहद्दीवर मरणाऱ्या पोलीस व सैनिकांविषयी वेगवेगळे नियम व कायदे आहेत. तर जनतेच्या मरण्याची दखल घ्यायला कोणाला सवड मिळणार आहे. अनेक वर्षांत निर्माण झालेले प्रश्न चुटकीसरशी सुटणार नाहीत हे इलेक्ट्रॉनिक्स मीडियाने लक्षात घ्यावे. त्यांनी अति घाई करू नये, असा सल्ला देताना संजय नहार म्हणाले, जम्मू-काश्मीरपेक्षा ईशान्य भारताचे प्रश्न मोठे आहेत. आपल्याकडच्या अनेक प्रश्नांसाठी आपण दिल्लीकडे बघत असतो पण दिल्लीतून हे प्रश्न सुटणार नाहीत, त्याची उत्तरे दिल्लीकडेच नाहीत. तेथे सगळे ठग बसले आहेत. त्यांना कोणत्याही प्रश्नांची उत्तरे नको आहेत. यासाठी अशा प्रश्नांची उत्तरे आता भारतीयांनाच हुडकावी लागतील. ही उत्तरे देशाच्या छोटय़ा-मोठय़ा शहरांत आणि गावांत सापडणार आहेत. म्हणून देशांतर्गत जाणीव जागृती चळवळ उभारायला हवी. जम्मू-काश्मीरसह सरहद्दीवरचे सगळे लोक, त्यांचे प्रश्न व समस्या आमच्याच आहेत याची जाणीव ठेवून आपण उभे राहायला हवे असेही नहार यांनी सांगितले.
आमदार मकरंद पाटील यांनी वाई सातारा जिल्हा व राज्यातील पत्रकारितेचा आढावा घेतला. प्रत्येकाला अभिमान वाटेल असे काम सर्व स्तरातील पत्रकारिता करत असते. पत्रकारितेने अनेक समस्या सोडवल्या समाजमन एकत्र बांधून ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या मतदारसंघातील पत्रकारांनी मला नेहमीच चांगला मार्ग दाखविला. टीकाटिप्पणीही केली पण त्याचा राग न धरता तो मित्रांचा एक सल्ला आहे असं मानून काम केले. समाज शिस्तीत व  प्रगल्भ होण्यासाठी सर्वानी एकत्र येऊन काम करावे असे त्यांनी सांगितले. या वेळी अरुणादेवी पिसाळ, दयानंद ढोमे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. शरद अभ्यंकर यांचे अध्यक्षीय भाषण झाले. अनिल जोशी यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल माने यांनी परिचय करून दिला. दत्ता मर्ढेकर यांनी आभार मानले. शिवाजीराव जगताप यांनी सूत्रसंचालन केले.

Bihar Lok Sabha Election Nitish Kumar Tejashwi Yadav Narendra Modi
तेजस्वींचा उदय, तर नितीश कुमारांचा अस्त; बिहारच्या राजकारणात ‘मोदी फॅक्टर’ चालेल का?
Nana Patole criticize Narendra Modis engine is broken and leading the country to decline
मोदींचे इंजिन बिघडलेले अन् देशाला आधोगतीकडे नेणारे, नाना पटोले यांचे टीकास्त्र
prakash ambedkar narendra modi
“पंतप्रधान मोदी हे संघ व भाजपला संपविण्याचे काम करीत आहे”; ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “हफ्ता वसुली…”
Prakash Ambedkar, North Indians,
“भाजपला मनसेच्या पाठिंब्यामुळे उत्तर भारतीयांमध्ये असुरक्षिततेची भावना”, प्रकाश आंबेडकरांचे विधान; म्हणाले, “भाजपने…”